

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थासाठी कामांचा धडाका सुरू आहे. त्याचा फटका येथील नागरी जीवनाला बसत असून, भाविकांना वेठीला धरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी शिल्लक असलेला एकमेव रस्ता खोदण्यात आला आहे. त्याच वेळी गेल्या एक वर्षापासून काम सुरू असलेला रस्ता अद्यापही निर्माणाधीन अवस्थेत आहे.
वास्तविक त्या रस्त्याचे काम पूर्ण करून रहदारीसाठी खुला केला असता, तर आजची स्थिती निर्माण झाली नसती. नगर परिषदेच्या अधिकृत बहुमजली वाहनतळ इमारतीपर्यंत वाहनांना येण्यासाठी रस्ता नसल्याने भाविक प्रवाशांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. गजानन महाराज प्रवेश कमान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याच्या एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू केल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील हॉटेल्ससमोर ग्राहकांची वाहने उभी राहतात. त्यामुळे येथे वळण घेणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. याकडे नगर परिषद आणि पोलिसांनी लक्ष देण्याची आवश्यकता असताना यावर उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बस अद्ययावत बांधलेल्या स्थानकात येणे बंद करून स्थानक थेट शहराबाहेर हलवण्यात येते. यावेळीदेखील तोच उपाय अंमलात आणला आहे. याबाबत शहरातील नागरिकांत रोष व्यक्त होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हॉटेल्ससमोर होत असलेले अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना दोन किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. ऑटोरिक्षासाठी मागतील तेवढे पैसे मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातून बाजारासाठी आलेले ग्रामस्थ डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांची धावपळ उडवणारे बसस्थानकाचे हे नियोजन अनाकलनीय ठरले आहे. जव्हार फाटा- महादेवी मंदिर मार्गे शहरात येणारा रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा. शहरातील स्थानकातूनच बस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे. नगर परिषदेच्या वाहनतळाकडे येणारा रस्ता अनेक महिन्यांपासून बंद ठेवल्याने जमेल तेथे खासगी पार्किंग करणाऱ्यांचा धंदा तेजीत आला आहे. आता बसस्थानक शहराबाहेर नेल्याने ऑटोरिक्षा चालकांना त्याचा फायदा होत आहे. तथापि, अशा प्रकारचे नियोजन भाविक व प्रवाशांना त्रासदायक आणि खिशाला कात्री लावणारे ठरत आहे.
प्रवाशांना पायी चालायला जागा नाही
अद्ययावत बसस्थानक बंद ठेवल्याने येथे शुकशुकाट आहे. गावाबाहेर दोन किलोमीटरवर असलेल्या सिंहस्थ बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. बाजूलाच नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर बस उभ्या करून प्रवाशांची चढ-उतार होत आहे. विद्यार्थी, वयोवृद्ध व दिव्यांगांना वाहनांतून वाट काढताना जीव मुठीत घेऊन बस पकडावी लागते. या रस्त्यावर खासगी वाहने उभी असतात. त्यांच्या अलीकडे बस उभ्या राहतात. त्यामुळे वाहतुकीसाठी वाहनांना रस्ता नाही आणि प्रवाशांना पायी चालायला जागा नाही, अशी आहे. पोलिस त्याकडे निर्विकारपणे पाहत आहेत. अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या प्रकाराला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.