

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २१ हजार ७१२ कर्ज खातेदार पात्र ठरले आहेत. तसेच १८०४ खातेदारांना दोन लाखांवरील कर्ज भरण्याची संधी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील १२७ शेतकऱ्यांनी ५७ लाखांचा कर्ज भरणा करत कर्जमुक्तीचा लाभ पदरात पाडून घेतला आहे.
शासनाने २ जून २०२६ व १५ जुलै २०२६ च्या शासन निर्णयानुसार 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, तर दोन लाखांवरील थकबाकीदारांसाठी एकवेळ समझोता योजना आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे.
या योजनेंतर्गत जिल्हा बँकेने शासनाच्या पोर्टलवर एकूण २३ हजार ७९८ कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली होती. यापैकी २१ हजार ७१२ खाती नियमित कर्जमाफीसाठी, तर २ हजार ८६ खाती दोन लाखांवरील ओटीएस योजनेसाठी पात्र ठरली होती. राज्य शासनाने संगणकीय संस्करणानंतर नुकतीच दोन लाखांवरील थकीत कर्जखात्यांची 'यादी क्रमांक ६' प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ८०४ कर्ज खात्यांचा समावेश आहे.
ही यादी बँकेची सर्व शाखा कार्यालये, प्राथमिक शेती संस्था (विविध कार्यकारी सोसायट्या) आणि गावनिहाय ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील पात्र १ हजार ८०४ शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ अखेर असलेल्या थकीत कर्जापैकी दोन लाख रुपयांवरील अतिरिक्त रकमेचा भरणा बँकेत करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी ही रक्कम भरल्यानंतर बँकेमार्फत त्यांच्या खात्याची माहिती पुन्हा शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जाईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यावर त्यांना शासनाकडून दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. तालुकानिहाय पात्र सभासदांपैकी आजअखेर १२७ शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील थकबाकीपोटी एकूण ५७.०२ लाख रुपयांचा भरणा करून या एकवेळ समझोता योजनेत सहभाग नोंदवला आहे.
यादीतील उर्वरित १ हजार ८०४ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी बँकेचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना विनंतीपत्र देत आहेत. पात्र शेतकरी बांधवांनी जवळच्या बँक शाखेत जाऊन दोन लाखांवरील थकबाकीचा भरणा करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांनी केले आहे.
सटाणा : ७४
देवळा : ३४
इगतपुरी : १७
मालेगाव : ८३
नाशिक : १७६
पेठ : ९
सुरगाणा : १
येवला : ८५
चांदवड : १६०
दिंडोरी : ५५६
कळवण : ५८
नांदगाव : ९३
निफाड : ३४३
सिन्नर : ७४
त्र्यंबकेश्वर : ४१
एकूण : १८०४