Nashik Kumbh mela |ध्वजस्तंभावरील पुरोहित संघाच्या लोगोवरून वादाची ठिणगी !

Controversy over Purohit Sangh logo on flagstaff- त्र्यंबक येथे महाध्वजारोहणापूर्वीच आक्षेप; शासकीय ध्वजस्तंभावर संस्थेचे बोधचिन्ह लावण्यावरून चर्चा
Nashik Kumbh mela
Nashik Kumbh mela
Published on: 
Updated on: 

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महाध्वजारोहण सोहळ्यापूर्वीच त्र्यंबकेश्वर येथील धर्मध्वजस्तंभावरील बोधचिन्हावरून नवा वाद निर्माण झाला आहे. कुशावर्त तीर्थ येथे उभारण्यात आलेल्या धर्मध्वजस्तंभावर त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचा लोगो लावण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेतला जात आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा व्यापक धार्मिक परंपरेचा आणि लाखो-कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय असताना, ध्वजस्तंभावरील खासगी संस्थेच्या बोधचिन्हाबाबत निर्णय कोणी घेतला, यावरून चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अशा कोणत्याही प्रकाराचे खंडन केले असून, ध्वजस्तंभावरील लोगोवरून विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचे म्हटले आहे.

Nashik Kumbh mela
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 40 कोटींचे मॉड्युलर फिल्ड हॉस्पिटल उभारण्यास राज्य शासनाची मान्यता

त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर गुरुवारी (दि.१५) ३१ फुटी धर्मध्वजस्तंभाची धार्मिक विधींनुसार प्रतिष्ठापना करण्यात आली. कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला साधू-संत, महंत, पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ध्वजस्तंभावर समुद्रमंथनाची संकल्पना, गणेशाची प्रतिमा, अमृतकलश आणि गरुडाची प्रतिमा यांसारखी धार्मिक प्रतीके साकारण्यात आली आहेत. मात्र, या रचनेत पुरोहित संघाचा लोगो समाविष्ट केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावर पुरोहित संघाने स्पष्टीकरण देताना ध्वजस्तंभावर पूर्वी पुरोहित संघाचे नाव होते. त्या जागेवर आता अधिकृत लोगो प्राप्त झाल्याने तो लावण्यात आल्याचे नमूद केले आहे.

Nashik Kumbh mela
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शैव आणि वैष्णव आखाडे एकत्र येणार; गोदाघाटावर होणार संयुक्त महाआरती

दरम्यान, कुंभमेळा हा कोणत्याही एका संस्था किंवा संघटनेपुरता मर्यादित नसून विविध आखाडे, साधू-महंत, धार्मिक परंपरा आणि भाविकांचा सामूहिक सोहळा आहे. त्यामुळे सार्वजनिक धार्मिक सोहळ्याशी संबंधित ध्वजस्तंभावर एखाद्या विशिष्ट संघटनेचे बोधचिन्ह लावणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोगोचा समावेश करण्यामागील निर्णयप्रक्रिया, त्याला प्रशासनाची मान्यता होती का आणि इतर धार्मिक संस्थांना याबाबत विश्वासात घेण्यात आले होते का, याची स्पष्टता होणे, आवश्यक मानले जात आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ महाध्वजारोहण सोहळ्यापूर्वी या वादावर तोडगा निघणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर मागील वेळीही पुरोहित संघाचे नाव होते. मात्र, गत १२ वर्षांत पुरोहित संघाने महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र शासनाकडून पुरोहित संघाचा लोगो नोंदणीकृत करून घेतला आहे. त्यामुळे तो लोगो त्याठिकाणी आलेला आहे. पूर्वीचे नाव केवळ लोगोत रूपांतरित झाले आहे.

-मनोज थेटे, अध्यक्ष, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर

लोगोबाबत कोणाचीही तक्रार आलेली नाही. आखाडा परिषदेनेही कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे अशा विषयांवर वाद घालण्याऐवजी सर्वांनी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. ध्वजस्तंभावरील लोगोवरून विनाकारण वाद निर्माण केला जात आहे. हा कोणत्याही खासगी संघटनेचा विषय नसून पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसारच हे करण्यात आले आहे.

- गिरीश महाजन, पालकमंत्री

logo
Pudhari News
pudhari.news