

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी २०२७ मधील नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यादरम्यान उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक 'मॉड्युलर फिल्ड हॉस्पिटल विथ ट्रायज अँड ट्रॉमा रिस्पॉन्स युनिच' उभारणार आहे. या प्रकल्पासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला देश-विदेहातून सुमारे १२ ते १५ कोटी भाविक उपस्थित राहण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सोहळ्याची सुरुवात होणार असून, २४ जुलै २०२८ रोजी ध्वजावतरणाने त्याची सांगता होणार आहे.
सुमारे २१ महिने चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाळ्यातील गर्दी आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी राहणार आहे.
प्रस्तावित मॉड्युलर फिल्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे तातडीने वर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र ट्रायज युनिच आणि गंभीर जखमी रुग्णांवर उपचार करण्यासाठी ट्रॉमा रिस्पॉन्स युनिच उपलब्ध असेल. गर्दीच्या ठिकाणी धसगोंधरी, अपघात किंवा अन्य वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास रुग्णांची प्रकृती लक्षात घेऊन उपचारांचे प्राधान्य निश्चित करणे शक्य होणार आहे.
गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांना तातडीने जीवनरक्षक उपचार देण्याच्या दृष्टीने हे रुग्णालय उपयुक्त ठरणार आहे. मॉड्युलर पद्धतीने उभारणी होणार असल्यामुळे गरजेनुसार रुग्णालयाची उभारणी करणे तसेच त्याचे स्थलांतर करणेही सुलभ होणार आहे.
५५० कोटींच्या मंजूर आराखड्यातून निधी:
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, साहित्य आणि यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी राज्य कार्यकारी समितीने ५५० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. याच निधीतून कुंभमेळा प्राधिकरणच्या मागणीनुसार ४० कोटी रुपये खर्चून मॉड्युलर फिल्ड हॉस्पिटलचा पुरवठा होणार आहे.
या रुग्णालयाच्या तांत्रिक वैशिष्ट्यांना तांत्रिक मूल्यमापन समितीने २२ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली होती. शासनाकडून रुग्णालयाचा पुरवठा झाल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर कार्यान्वित करण्याची जबाबदारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडे असेल.
आपत्कालीन आरोग्यसेवेला बळ:
कोटीवधी भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ४० कोटींच्या मॉड्युलर फिल्ड हॉस्पिटलला मिळालेली मंजुरी महत्वपूर्ण मानली जात आहे. या सुविधेमुळे आपत्कालीन उपचारांची उपलब्धता वाढवणे, गंभीर रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत देणे आणि कुंभमेळ्यातील आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम करणे शक्य होणार आहे.