

Trimbak again under flood siege, 95 mm of rain recorded overnight
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
मंगळवारी (दि. १) रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. उत्तररात्री सुरू झालेला पाऊस पहाटे ४ पर्यंत अविरत सुरू होता. या काळात शहरवासीय गाढ झोपेत असताना मेनरोड, तेली गल्लीसह अनेक भागांत पूरपाण्याने वेढा घातला होता. बुधवारी सकाळपर्यंत ९५ मिमी पावसाची नोंद झाली.
पावसाला सुरुवात होऊन दीड महिना उलटून गेला असला तरी, पावसाचे पाणी अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ घेऊन येत आहे. मेनरोड परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी गाळ साचल्यामुळे संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता केवळ तासभर संततधार लागली तरी मेनरोड आणि आजूबाजूच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती उद्भवते.
या पाण्यात गाळ, माती तसेच गटारातील सांडपाणी मिसळून सखल भागांतील घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
आजूबाजूच्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्यामुळे हलक्या पावसातही लाल माती आणि गटाराचे काळे पाणी रस्त्यावर वाहत आहे. प्रवाहांचे मार्ग आणि गटारांचे नियोजन विस्कळीत झाले असून, नव्या वसाहतींमधील पाणी थेट नाशिक-त्र्यंबक रस्ता व रिंग रोडवर येत आहे. परिणामी, अपघातांची शक्यता वाढली असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.