

नाशिक : आदिवासी विकास विभागातील रोजंदारी शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्री नरहरी झिरवाळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून हा प्रश्न राज्याच्या कॅबिनेट बैठकीत मांडला जाईल, असे आश्वासन आमदार हिरामण खोसकर यांनी शनिवारी (दि.१९) आंदोलनकर्त्यांना दिले.
आदिवासी विकास भवनासमोर रोजंदारी वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. शनिवारी या आंदोलनाचा ११ वा दिवस होता. आ. खोसकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान आ. खोसकर यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत मंत्री झिरवाळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून मंगळवारी याबाबत अजित पवार विषय घेण्याची शक्यता आहे.
आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारकडून गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून येत्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा मांडला जाईल. तसेच यासंदर्भात आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ मंत्री झिरवाळ यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रलंबित मागण्या लवकर मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.