

Birhad protesters will meet Raj Thackeray today
नाशिक : पुढारी वृत्तसेवा बाह्यस्रोताद्वारे भरती प्रक्रिया रद्द करा, या मागणीसाठी आठ दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयासमोर बसलेल्या आंदोलनकर्त्यांना आदिवासी विकासमंत्र्यांपाठोपाठ आदिवासी आयुक्तालय प्रशासनाकडून पात्रताधारक शिक्षकांचीच कंत्राटी पदद्धतीने भरती करण्यात येईल, असे स्पष्टपणे सांगण्यात आल्याने आंदोलनकर्ते आता राज ठाकरेंना भेटण्याच्या तयारीत आहे.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५० आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटीत आंदोलनकर्ते राज ठाकरेंना आंदोलनाविषयी माहिती देणार असून, समस्येवर तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली. बाह्यस्रोताद्वारे केली जाणारी भरती प्रक्रिया रद्द करून आम्हाला पदस्थापना द्या, अशी मागणी रोजंदारी कर्मचारी करत आहेत. माजी आमदार जे. पी. गावित, कामगारनेते डॉ. डी. एल कराड यांनी बुधवारी (दि. १६) आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
गावित यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आंदोलनकत्यांना दिले आहे. दरम्यान, आंदोलनकत्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार, माजी आमदार जे. पी. गावित, कॉंग्रेस नेते लकी जाधव, राजू देसले आदी नेते शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत. मात्र पात्रताधारक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यावर शासन ठाम असल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून बुधवारपासून (दि.९) आदिवासी आयुक्तालयासमोर पोलिस प्रशासनाचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाचा दहावा दिवस असून, आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने नऊ दिवसांपासून पोलिस कर्मचारी २४ तास तैनात असल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.