

नाशिक: शहरातील विविध भागांत तीन मुलींना आमिष दाखवून - अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अपहरणाचा पहिला प्रकार नांदूर नाका येथे घडला. फिर्यादी हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची मुलगी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली. ती उशिरापर्यंत घरी परतली नाही. या मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या संशयातून अनोळखी व्यक्तीविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरा प्रकार पाथर्डी फाटा परिसरात घडला. फिर्यादी हे पाथर्डी परिसरातील नरहरीनगर भागात राहतात. त्यांची मुलगी काल (दि. २१) सकाळी घरी - होती. या मुलीला अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरणाचा तिसरा प्रकार उपनगर येथे घडला. फिर्यादी हे उपनगर परिसरात राहतात.
त्यांची मोठी मुलगी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कॉलेजला जाऊन येते, असे सांगून घरातून निघून गेली. ती अद्याप घरी परतली नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.