

नाशिक : जिल्ह्यातील नगर परिषदांचे निकाल हाती आले असून, 11 पैकी तब्बल पाच नगर परिषदांमध्ये महिलाराज आला आहे. भगूर, सटाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व ओझर या नगर परिषदांत मतदारांनी लाडक्या बहिणीला साथ दिली आहे. सहा ठिकाणी लाडके भाऊ नगर परिषदांचा कारभार हाकणार आहे. यात, विशेष म्हणजे तिघी लाडक्या बहिणी शिंदे शिवसेनेच्या आहेत. इगतपुरीच्या नगराध्यक्षा शालिनी खातळे यांनी सर्वाधिक मते घेतली आहेत.
जिल्ह्यातील भगूर, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, मनमाड, चांदवड, सटाणा, पिंपळगाव बसवंत, ओझर व येवला नगर परिषदेसाठी निवडणूक झाली. झालेल्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यात पाच नगर परिषदांच्या चाव्या महिला नगराध्यक्षांच्या हाती आल्या आहेत. भगूर येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी 5 हजार 407 मते घेतली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अनिता करंजकर यांचा 1913 मतांनी पराभव केला.
त्र्यंबकेश्वरमध्ये शिंदे शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार यांनी भाजपच्या कैलास घुले यांचा 868 मतांनी पराभव केला. इगतपुरीत शिंदे शिवसेनेच्या शालिनी खातळे यांनी 10 हजार 151 मते घेतली. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार मधुमालती मेहंद्रे यांचा 5 हजार 870 मतांनी धूळ चारली. ओझरला भाजपच्या अनिता घेगडमल यांनी उबाठा शिवसेनेच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा 3200 मतांनी पराभूत करत नगराध्यक्षा झाल्या. सटाण्यात शिंदे शिवसेनेच्या हर्षदा पाटील यांनी भाजपच्या योगिता मोरे यांचा तीन हजारांनी पराभव केला. पाच महिलांपैकी तीन शिंदे शिवसेनेच्या असून, प्रत्येकी एक-एक भाजप व राष्ट्रवादीच्या आहेत.
या पाच महिला नगराध्यक्षांनी रोवला विजयी झेंडा
प्रेरणा बलकवडे (राष्ट्रवादी)
त्रिवेणी तुंगार (शिंदे शिवसेना)
शालिनी कंठाळे (शिंदे शिवसेना)
अनिता घेगडमल (भाजप)
हर्षदा पाटील (शिंदे शिवसेना)