

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे वरुणराजाच्या बरसणाऱ्या धारा आणि दुसरीकडे टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर 'हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा'चे स्वर अशा भक्तिरसात चिंब झालेल्या हजारो वारकऱ्यांनी संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे स्वागत केले. 'निवृत्तीचा सखा विठ्ठलरूप देखा । निरालंब शिखा गगनोदरीं...ची' प्रचिती ठायीठायी जाणवत होती.
त्र्यंबक मार्गावर सातपूरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जणू काही पंढरी अवतरली होती. त्र्यंबकेश्वरमधून नाथांच्या पालखीने पंढरपूरसाठी प्रस्थान केले. त्र्यंबकेश्वर-महिरावणी आणि सातपूर असा मुक्काम करत बुधवारी (दि.१) सकाळी ७ ला संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी सातपूर मार्गावरील पंचायत समितीच्या आवारात दाखल झाली.
पालखीच्या थांब्याचे यंदा १३३ वे वर्षे असून, पंचायत समिती आवारात नाथांच्या चांदीच्या रथातील पादुकांचे भाविकांसह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मनोभावे दर्शन घेतले. विठूरायाच्या नाम गजरासोबतच संत निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताईंचा जयघोष करीत पालखीने गणेशवाडी त्यानंतर काझीपुऱ्यातील श्री नामदेव विठ्ठल महाराज मंदिर, सोनारवाडा अशा विविध ठिकाणी संस्था आणि संघटनेकडून पाहुणचार स्वीकारला.
ही पालखी उद्या (दि.२) शहराबाहेर प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर नाशिकरोड- सिन्नरमार्गे दातली येथे पालखी पहिले रिंगण पूर्ण करणार आहे. पंचायत समितीच्या आवारात महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ,
रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास महाराज, माधवदास महाराज राठी, माजी आमदार बाळासाहेब सानप, मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, शिवाजी चुंभळे, पद्माकर पाटील, संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सोमनाथ घोटेकर, श्रीपाद कुलकर्णी, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अण्णा महाराज हिसवळकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी स्वागतासाठी उपस्थित होते.