Pandharpur Wari 2026: वारकऱ्यांच्या स्वागतास जिल्हा परिषद सज्ज

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे स्वतः पालखी मार्गाची पाहणी करताना दिसत आहे.
Pandharpur Wari 2026
Pandharpur Wari 2026Pudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यातून जाणाऱ्या चार प्रमुख पायी पंढरपूर दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा परिषदेतून आवश्यक रस्ता दुरुस्ती, फिरते शौचालय, स्नानगृह, टँकर, आरोग्य सुविधा देण्यासाठी तसा मायक्रो प्लॅनिंगही केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे स्वतः पालखी मार्गाची पाहणी करताना दिसत आहे.

दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीची तयारी सुरू आहे. पैठण येथून शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी, पिंपरखेड येथून श्रीसंत निळोबाराय महाराज पालखी, त्र्यंबकेश्वर येथून विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी, तर नेवाशातून श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी दिंडी पंढरी वारीसाठी जाणार आहे.

Pandharpur Wari 2026
Yellow Alert: राज्यात मान्सून स्थिरावला; जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’

जिल्हयातून साधारणतः दीड लाख भाविक वारीत जातात. वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी वारी मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील यंत्रणा अलर्ट असणार आहे. शासनाकडुनही औषधांसाठी 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे. मुक्कामाच्या ठिकाणीही उपकेंद्रातील कर्मचारी आरोग्य सेवा देणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे हे नियोजन करत आहेत.

४०० शौचालये; ३५० स्नानगृहे

श्री निवृत्तीनाथ पालखीसोबत जिल्हा परिषद नाशिक यांनी 250 फिरती शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. तर संत एकनाथ महाराज पालखीला 200, संत निळोबाराय दिंडीला 100, आणि श्री ज्ञानेश्वरी पायी दिंडीसोबत 100 अशा 400 फिरत्या शौचालयासह 350 स्नानगृहाची जबाबदारी अहिल्यानगर जिल्हा परिषदेने घेतली आहे. त्यासाठीचे नियोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांच्या ग्रामपंचायत विभागाकडून सुरू आहे.

पाण्याचे ११ टँकर; ३० ठिकाणी राहुट्या

जिल्हा परिषदेकडून मुक्कामाच्या 30 ठिकाणी राहुटी (जलरोधक मंडप) उभारण्यात येणार आहेत. याशिवाय 11 पाण्याचे टँकरही दिले जाणार आहेत. संत एकनाथ महाराजांच्या दिंडीला 5, संत निळोबाराय दिंडीला 3 आणि श्रीज्ञानेश्वरी पायी पालखीला 3 टँकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे.

प्रत्येक दिंडीला संपर्क अधिकारी नियुक्त

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दि. 5 जुलै रोजी जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक हे सज्ज आहेत. संत एकनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे दि. 8 जुलै रोजी जिल्ह्यात आगमन होईल, त्या ठिकाणी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके हे संपर्क अधिकारी असणार आहेत.

Pandharpur Wari 2026
Gold-Sliver Price: सोने दरात तीन हजारांची घसरण; चांदी दर वर्षातील नीचांकी स्‍तरावर

नेवाशाच्या संत ज्ञानेश्वरी दिंडीचे दि. 8 जुलै रोजीच प्रस्थान होईल. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजुषा ठक्कर यांच्याकडे जबाबदारी आहे. तर संत निळोबाराय दिंडीचे 10 जुलै रोजी प्रस्थान होणार असून, त्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ हे जबाबदारी पाहत आहे. दिंडीच्या मार्गावर स्वच्छता राखण्यासाठीची जबाबदारी स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांच्याकडे आहे.

दिंडी मार्गातील 53 ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सुविधा करण्यासाठी 78 लाखांचा निधी मिळणार आहे. पिंपळगाव उंडा ते जवळके, खर्डा ते भुतेवस्ती, खर्डा ते म्हसोबा मंदिर ते नान्नज, बालमटाकळी ते वाडगव्हाण ते लाडजळगाव रस्ता, मिडसांगवी ते मुंगसेवाडी, पिंपळनेर ते जवळे माळवाडी, गांज़ीभोयरे, वडुले, पिंपळनेर, रासकरवाडी, मावळेवाडी, कोरेगाव पालखी मार्ग, श्रीसंत निळोबाराय पालखी मार्ग, श्रीगोंदा टाकळी कडेवळीत मार्ग, पारेगाव ते काकडवाडी रस्ता, गोटुंबे आखाडा ते सडे वांबोरी रस्ता, अशा रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवणे इत्यादी कामे घेतली जाणार आहेत. बांधकामचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब नन्नावरे, सचिन चौधरी आदींची यंत्रणा त्यासाठी काम करत आहे.

पालकमंत्र्यांच्या सुचनांनुसार आणि सीईओंच्या मार्गदर्शनात पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी जिल्हा परिषद प्रशासन नियोजन करत आहेत. त्यासाठी रस्ता दुरुस्ती, फिरती शौचालये, स्नानगृहे, पाण्याचे टँकर तसेच आरोग्य सेवेबाबतही मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलेले आहे.

- विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news