

The task of igniting Maratha-OBC conflict: Awhad
नाशिक : पुढारी वृत्तसेवा हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळाले. मराठा - ओबीसी वाद पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष हुशारीने पेटविण्यात सरकार यशस्वी झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीच्या शिबिरात ते बोलत होते. ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद अतिशय संवेदनशील विषयाला हात लावत आहे. कोणाच्या हातात काय? कोणी काय गमावले? काहीच समजत नाही. मात्र दोन्ही समाज अस्वस्थ करण्यात यश आले आहे. सरकारमधील नेते जर बोलत नसतील, तर ओबीसींचे काय हाल आहेत. मराठा- ओबीसी वाद पेटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जमीनदार मराठा आज अल्पभूधारक झाला. आरक्षण कोणा एकासाठी येत नाही. मराठा समाजासाठी आम्ही सोबत राहू.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही आमच्या नेत्यांची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत आणला, तर आमचे खासदार तुमच्यासाठी उभे राहतील. परंतु, मराठा ओबीसी वाद लावण्यात सरकार यशस्वी झाले आहे. ओबीसी ६३ टक्के आहे. त्यामुळे बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जातीय जनगणना हा निर्णय घेतल्याचा हल्लाबोल आव्हाड यांनी केला.
भुजबळ यांच्याबाबत झालेल्या अवमानकारक वक्तव्याचा मी निषेध करतो. एका समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशी भाषा वापरणे राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. आपले राजकीय व्यासपीठ वेगळे असेल, पण परंपरेने आदर राखला गेला पाहिजे, असे सांगत आव्हाड यांनी शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंची सुरक्षा वाढवली होती, हे उदाहरण दिले.