

नाशिक : शंभूराज शेवाळे
सकाळचे थंड वारे अन् दाट धुक्यासह दोन दिवसांपासून थंडीचा कडावा काढला आहे. सलग सहा महिन्यांच्या पावसाळ्यानंतर हवेत गारवा वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. त्यामुळे नागरिकांकडून उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.
हवामान विभागाने यंदा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक तीव्र थंडी पडेल असा अंदाज वर्तविला आहे. यावर्षी पावसाळा लांबल्याने हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे थंडीचा कालावधी लांबेल आणि तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे. परिसरात नागरिकांना कमी दृश्यतेचा अनुभव येतो आहे. सकाळी ऑफिस आणि शाळेकडे जाणाऱ्या नागरिकांनी आता जॅकेट, मफलर आणि स्वेटर घालूनच बाहेर पडावे लागत आहे.
थंडीचा कडाका वाढल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये स्वेटर, जॅकेट आणि उबदार कपड्यांची विक्री वाढली आहे. मागील वर्षी थंडी कमी असल्याने विक्री मंदावली होती; मात्र यंदा थंडी वाढेल या अंदाजामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला आहे. नाशिक येथील तिबेटीयन मार्केटमध्ये स्वेटर विक्रीला सुरूवात झाली आहे. येथे स्वेटर, जॅकेट, मफलर आदी हिवाळी कपडे चांगल्या दर्जात आणि वाजवी दरात मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत आहे. दुकानदारांनी महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि मुलांसाठी विविध प्रकारचे स्वेटर, जॅकेट, शॉल, मफलर आणि हुडीचे नवीन कलेक्शन उपलब्ध करून दिले आहेत.
हिवाळा होणार स्टायलीश
लहान मुलांसाठी आकर्षक रंग आणि कार्टून डिझाईन्स असलेले स्वेटर बाजारपेठांमध्ये मिळत आहेत. किशोरवयीनांसाठी ट्रेंडी हूडी, स्टायलिश जॅकेट उपलब्ध आहेत. महिला वर्गासाठी रंगीबेरंगी फॅशनबल स्वेटर, शॉल आणि स्टायलिश जॅकेट बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी फॉर्मल लूक देणारे स्वेटर, जॅकेट आणि मफलर उपलब्ध आहेत तर ज्येष्ठांसाठी हलके पण उबदार कपडे आणि शॉल उपलब्ध आहेत. दुकानदारांच्या मते, महागाई आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे दरात सुमारे १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
उबदार कपड्याचे दर
• हातमोजे - १८० ते २५०
• स्वेटर - ५०० ते ९००
• लहान मुलांचे हाफ स्वेटर - ४५० ते १०००
• नवीन प्रकार - ९०० पासुन सुरू.
महिला
• स्वेटर – ८०० ते १५००.
• फॅशनेबल स्वेटर - १५०० ते २००० पर्यंत.
• लेदर जॅकेट – २००० पासुन सुरू.
• स्टॉल /शॉल – ३०० ते ४००.
• हातमोजे – १५० पासुन सुरू.
• चप्पल – २५० -३००.
पुरुष
• स्वेट शर्ट -८०० ते १०००.
• ट्रेंडी हूडी -९०० ते १२००.
• वूलन स्वेटर - १३०० पासून सुरू.
• बायकर जॅकेट – १७०० पासुन सुरू.
• कार्गो जॅकेट – २००० पासुन सुरू.
ज्येष्ठ नागरिक
• वूलन स्वेटर - ७०० ते ९५०.
• शॉल - ६०० ते ९००.
• मफलर आणि कानटोपी - २५० ते ४००.
• हातमोजे - १५० ते २५०.
थंडी वाढल्याने उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. महिला आणि लहान मुलांच्या स्वेटरला अधिक मागणी आहे. जॅकेट आणि मफलरचीही विक्री हळूहळू वाढत आहे. अजून थंडी वाढली की खरेदी वाढेल.
- अन्नप्पा देवादिगा, स्वेटर विक्रेता.