

नाशिक : शंभुराज शेवाळे
दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तिमय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री काशी नाट्टुकोटाईनगर छत्रम् मॅनेजिंग सोसायटीतर्फे आयोजित या महोत्सवात भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला.
कार्तिकी पौर्णिमा मंगळवारी (दि. ४) रात्री १०:३७ मिनिटांनी सुरू झाल्यानंतर श्री कार्तिक स्वामी मंदिर उघडण्यात आले. मंदिर परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. श्री कार्तिक स्वामींच्या मूर्तीवर महाअभिषेक, पूजन, आरती आणि नामस्मरण हे धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले. यावर्षीच्या महोत्सवात श्री कार्तिक स्वामींच्या मूर्तीला भाविकांच्या देणगीतून सोन्याचे नवीन आवरण चढवण्यात आले. पूर्वी चांदीच्या आवरणात असलेल्या मोराच्या मूर्तीलाही सुवर्ण आवरण चढवण्यात आले. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. भक्तांनी कार्तिक स्वामींना मोरपीस अर्पण करत आपल्या मनोकामना व्यक्त केल्या. संपूर्ण परिसरात ओम कार्तिक स्वामी नम, कार्तिक स्वामी महाराज की जय असा घोष घुमत होता.
मंदिर परिसरात पोलिसांनी वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. भक्तांनी शिस्तीत रांगेत जाऊन श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. महोत्सवानिमित्त मंदिरात प्रसादाची व्यवस्था, भक्तांसाठी अभिषेकाची सोय करण्यात आली होती. श्री काशी नाट्टुकोटाईनगर छत्रम् मॅनेजिंग सोसायटीतर्फे हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. श्री कार्तिक स्वामींच्या चरणी हजारो भक्तांनी दर्शन घेत आपल्या जीवनातील मांगल्याची प्रार्थना केली.