Tejas Aircraft : अखेर 'तेजस' घेणार झेप

Nashik News : वायुदलाला विमान सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा
Nashik News
लवकरच आकाशात झेपावणार 'तेजस'Pudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल प्रकल्पात संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या तेजस (मार्क १ए) या हलक्या लढाऊ विमानाची निर्मिती केली जात असून, त्यातील पहिल्या तेजस लढाऊ विमानाच्या उड्डाणाला संरक्षण मंत्रालयाच्या गुणवत्ता हमी महासंचालनालयाने (डीजीक्यूए) परवानगी दिली आहे. त्यामुळे तेजस झेप घेण्यास सज्ज झाले असून, विमानाला वायुदलाकडे सुपूर्द करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

एचएएल कंपनीत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या तेजसची निर्मिती केली जात आहे. याकरिता तब्बल १५० कोटींच्या खर्चातून स्वतंत्र प्रॉडक्शन लाइन तयार करण्यात आली आहे. एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या लाइनवर दरवर्षी आठ तेजस विमानांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. बेंगळुरूच्या 'एचएएल' प्रकल्पात या विमानाच्या उत्पादनाच्या दोन लाइन सुरू असून, त्यातून दरवर्षी सोळा विमाने निर्माण होतात.

Nashik News
'Tejas' Aircraft In Nashik | 'तेजस'ची पुढील महिन्यात झेप

मात्र, वायुदलाच्या वाढत्या मागणीमुळे ओझरलाही 'तेजस'ची निर्मिती सुरू करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर दीड वर्षात नव्या प्रॉडक्शन लाइनचे काम पूर्ण करण्यात आले व विमानांची प्रत्यक्ष निर्मिती सुरू झाली. आता संरक्षण मंत्रालयाच्या गुणवत्ता हमी महासंचालनालयाने या विमानाच्या उड्डाणाला मंजुरी दिली असून, 'एचएएल'च्या नाशिक विभागाच्या कार्यकारी संचालकांना नुकतेच याबाबतचे पत्र सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे हे विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज झाले आहे.

Nashik News
'NIMA Index-2024' | 'तेजस'ची बांधणी, 'जिंदाल'ची गुंतवणूक, आयटी कंपनीशी करार

83 विमानांची निर्मिती

'एचएएल'ला एकूण ८३ तेजस विमानांच्या निर्मितीची ४८ हजार कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यापैकी सोळा विमाने नाशिक 'एचएएल'मध्ये निर्माण होणार आहेत. नाशिकमध्ये निर्मित पहिले तेजस विमान मार्च २०२५ पर्यंत वायुदलाकडे सुपूर्द करण्याचे नियोजन होते. मात्र, अमेरिकेच्या जीई कंपनीकडून एफ ४०४ आयएन २० या इंजिनाच्या पुरवठ्याला उशीर झाला. मार्चपासून इंजिन मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हे विमान तयार होऊन मागील काही महिने त्याच्या निरनिराळ्या चाचण्या सुरू होत्या.

विविध निकषांची पडताळणी

लढाऊ विमानाच्या डिझाइनपासून ते प्रत्यक्ष निर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर संरक्षण मंत्रालयाच्या निरीक्षकांकडून विविध निकषांची पडताळणी केली जाते. विमान तयार झाल्यानंतर त्याच्या काटेकोर चाचण्या घेतल्या जातात. लढाऊ विमानासाठी निश्चित मानके व निकषांच्या पडताळणीनंतरच संरक्षण मंत्रालयाकडून विमान उड्डाणाला मंजुरी दिली जाते. 'तेजस'च्या बाबतीत हा महत्त्वाचा टप्पा पार पडला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी

हवेतून हवेत मारा करणाऱ्या 'अस्त्र' या क्षेपणास्त्राला वाहून नेण्यासाठी तेजसचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या विमानामार्फत वायुदलाकडून 'अस्त्र' या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे नियोजन करण्यात आले आहे. अस्त्र स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. तेजस फायटर जेटने २० हजार फूट उंचीवरून अस्त्र क्षेपणास्त्र डागले, ज्याने अचूकपणे लक्ष्यावर मारा केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news