

नाशिक : नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात 'एचएएल' येथे निर्मित पहिले लढाऊ 'तेजस' झेप घेण्यास सज्ज झाले आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस तेजस भारतीय वायुसेनेला सुपूर्द केले जाणार असून, नाशिककरांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. वास्तविक, मार्च २०२५ पर्यंत पहिले तेजस भारतीय वायुसेनेकडे सुपूर्द करण्याचे नियोजन होते. मात्र, महिनाभर विलंब झाल्याने, एप्रिलमध्ये याबाबतची प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या विमानाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याच्या चाचण्या सुरू होणार असल्याची माहिती 'एचएएल'मधील सूत्रांनी दिली आहे.
१५० कोटींच्या खर्चातून स्वतंत्र प्रॉडक्शन लाइन
दरवर्षी आठ लढाऊ तेजसची करणार निर्मिती
बंगळुरूच्या प्रकल्पातही १६ विमानांची निर्मिती
८३ तेजस विमानांच्या निर्मितीसाठी ३६ हजार ४६८ कोटी रुपये खर्च
विमान निर्मितीसाठी केंद्राकडून आणखी ९ हजार कोटी मंजूर
नाशिकच्या एचएएल प्रकल्पात प्रथमच निर्मिती होत असलेल्या 'तेजस'साठी दीडशे कोटींच्या खर्चातून स्वतंत्र प्रॉडक्शन लाइन तयार करण्यात आली आहे. २०२३ च्या एप्रिल महिन्यात या लाइनचे उद्घाटन करण्यात आले होते. या लाइनवर दरवर्षी आठ तेजसची निर्मिती केली जाणार आहे. तर बेंगळुरू येथील 'एचएएल'मध्ये तेजसच्या उत्पादनासाठी दोन लाइन सुरू असून, त्यातून दरवर्षी १६ विमानांची निर्मिती केली जाते. मात्र, वायुसेनेकडून वाढत्या मागणीमुळे ओझर प्रकल्पात 'तेजच'च्या निर्मितीची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर दीड वर्षात नव्या प्रॉडक्शन लाइनचे काम पूर्ण करण्यात आले व विमानांची प्रत्यक्ष निर्मिती सुरू झाली. 'एचएएल'ला ८३ तेजसच्या निर्मितीसाठी ३६ हजार ४६८ कोटींची ऑर्डर मिळाली आहे. या लढाऊ विमानांची अत्याधुनिक आवृत्ती विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी ९ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
स्वदेशी बनावटीच्या तेजस निर्मितीबरोबरच 'एचएएल'ला २०२३ मध्ये संरक्षण मंत्रालयाची 'एचटीटी ४०' प्रकाराची ७० विशेष प्रशिक्षण विमाने बनवण्याची ऑर्डरही मिळाली होती. ६ हजार ८२८ कोटी रुपयांचे हे काम असून, त्यातून वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली विमाने निर्माण केली जाणार आहेत. या दोन्ही विमानांच्या निर्मितीबाबत एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी 'निमा इंडेक्स' प्रदर्शनात माहिती दिली होती.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था व 'एचएएल' यांनी मिळून लढाऊ तेजचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पुढील काही वर्षात ८३ तेजस व ७० एचटीटी- ४० अशा एकुण १५३ विमानांची नाशिकच्या ओझर येथील एचएएल प्रकल्पात निर्मिती केली जाणार आहे. पुढील काही वर्षे याबाबतचे काम चालणार आहे.
नाशिकच्या औद्याेगिक इतिसहासात एचएएलच्या येण्याने क्रांती झाली होती. आता संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजसची नाशिकमधून निर्मिती केली जात असल्याने, ही बाब क्रांती घडविणारी म्हणावी लागेल. एचएएलच्या सीईओने 'निमा इंडेक्स'मध्येच याबाबतचे सुतोवाच केले होते. यामुळे स्थानिक उद्योगांना नवीन काम मिळण्याच्या संधी उपलब्ध होतील.
धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा, नाशिक.