

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव येथील प्रशांतदादा हिरे विद्यालयातील प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी शनिवारी (दि. १२) नाशिकमध्ये प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. राज्य शिक्षक परिषद, नाशिक विभागाकडून गोल्फ क्लब मैदान ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
मोर्चानंतर आंदोलक शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या शिक्षकांनी निवेदन देत बोरसे यांना न्याय मिळालाच पाहिजे, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह विजय बडे, दत्ता वाघे, भगवान सानप, संजय चव्हाण, भगवान सानप,
आर. डी. निकम, प्रफुल्ल निकम, सचिन पाटील, संजय पाटील, त्र्यंबक मार्कंड, गोरख कुनगर, एस. बी. देशमुख, सुभाष सोनवणे, श्याम पाटील आदी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभाग नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
निवेदनात म्हटले की, शिक्षकांना प्रशासकीय कामकाजाच्या नावाखाली वारंवार चौकशीला सामोरे जावे लागत असून, त्यातून मानसिक दबाव निर्माण होत आहे. शिक्षकाला सतत संशय आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकविणे थांबवावे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
बोरसे यांच्या कुटुंबीयांना शासनाने पाच कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, वारसांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारावी आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरीची तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील अनावश्यक चौकशा थांबवून संवेदनशीलतेने काम करावे, अशी मागणीही केली.
मोर्चामध्ये शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. शाळेत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाह्यशक्तीच्या दबावापोटी कारवाई केल्याचा आरोप केला. तसेच प्रा. बोरसे यांचा राजकीय आकसामुळे बळी घेतल्याचा आरोप केला.
प्रा. बोरसे यांच्या मृत्यूमुळे संतप्त शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केवळ शिष्टमंडळाला कार्यालयात सोडले. त्यामुळे ज्या शिक्षकांना कार्यालयात प्रवेश मिळाला नाही, त्यांनी संताप व्यक्त करीत प्रवेशद्वारावर धडका दिल्या.