

देवगाव : पुढारी वृत्तसेवा
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागातील शेती आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दुष्काळाच्या या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साजरे करताना सामाजिक परिस्थितीचे भान ठेवण्याचा अनोखा संदेश येथील मविप्रच्या अभिनव बालविकास मंदिरातील शिक्षक व विद्यार्थी यांनी रांगोळीतून दिला. 'पाऊस नाही... शेती नाही... तरी आमची दिवाळी साधी आहे...' या आशयाच्या रांगोळीतून दुष्काळाची दाहकता, शेतकरी कुटुंबाची परिस्थिती आणि साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निर्माण झालेली आर्थिक अडचण, पाण्याची टंचाई आणि शेतीची दुवस्था या रांगोळीतून प्रतीकात्मक पद्धतीने साकारण्यात आली. एका बाजूला कोरडी, भगाळलेली जमीन, तर दुसरीकडे शेतकरी कुटुंबाचे चित्र रेखाटून शिक्षकांनी समाजाचे लक्ष ग्रामीण वास्तवाकडे वेधले. दिवाळीचा आनंद साजरा करताना दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या परिस्थितीची जाणीव ठेवण्याचे आवाहनही या कलाकृतीतून करण्यात आले.
दरम्यान, शाळेत दिवाळीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी यांनी विविध आकारांची आकर्षक शुभेच्छापत्रे तयार करून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक आकाशकंदील तयार करून वर्गाची सजावट केली.
मुख्याध्यापक सुदर्शन जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्त्व सांगून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विद्यार्थी यांनी फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.
संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापति डी. बी. मोगल, संचालक शिवाजी गडाख, शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, आबूभाई काद्री, गजीराम खुळे, सचिन बोचरे, प्राचार्य डी. आर. चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीसाठी स्वाती घोटकर, जयश्री गांगुडे, सोनाली उन्वणे, आशा सोनवणे, नितेश राऊत, अंकुश बोराडे यांनी प्रयत्न केले.