

बेळगाव : देवगावमध्ये (ता. कित्तूर) क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ६) घडली होती. त्यानंतर कित्तूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच संशयित आरोपीला अटक केली आहे. प्रकाश कल्लाप्पा कालार (वय ३०, रा. देवगाव ता. कित्तूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महांतेश निंगाप्पा हुच्चण्णावर (वय ५२, रा. देवगाव, ता. कित्तूर) याचा खून केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ६) पहाटे २.३० च्या सुमारास देवगाव बसस्थानकाजवळील कालार यांच्या घरासमोर ही घटना घडली. महांतेश हे संशयित प्रकाश कालारच्या घरी झोपले होते. यावेळी तू माझ्या घरी का झोपला आहेस, अशी विचारणा प्रकाशने केली. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर संशयिताने महांतेश यांना घराच्या दाराजवळ पाडले. त्यानंतर जवळील मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला.
या घटनेनंतर संशयिताने मृतदेह घराबाहेर ओढत नेऊन रस्त्यावर फेकून दिल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मृताचे नातेवाईक राजू पुंडलिक हुच्चण्णावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक वीरय्या हिरेमठ, कित्तूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण गंगोल, उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व पोलिस पथकाने तातडीने तपास सुरु केला. या घडलेल्या घटनेनंतर जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी काही तासातच संशयिताला अटक केली. याबद्दल जिल्हा पोलिसप्रमुख व अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले आहे.