

चारठाणा : चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवगाव शिवारात झाडाच्या आडोशाला सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह एकूण १ लाख २ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विविध गावांतील ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, देवगाव शिवारातील आमवन जवळील जिनिंगच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत, झाडाखाली काही लोक गोलाकार बसून पैशांवर 'तीन पत्ती' नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांना मिळाली होती.
माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पथकाने अत्यंत गोपनीयतेने सदर ठिकाणी सापळा रचून धाड टाकली. पोलिसांना पाहताच जुगाऱ्यांची एकच पळापळ झाली, परंतु सतर्क पोलिसांनी घेराव घालून ११ जणांना रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये खाजाभाई (रा. सेलु), कमलाकर विश्वनाथ देशमुख (रा. टाकळी कुंभकर्ण, ता. परभणी), रामकिसन साहेबराव गाडे (रा. सातोना, ता. परतूर), अशोक लक्ष्मण आखात (रा. सातोना, ता. परतूर, जि. जालना), विजय नारायण कुरवाळे (रा. फुले नगर, कारेगाव रोड, परभणी), अजरखान अजीजखान पठाण (रा. मंठा, ता. मंठा, जि. जालना), विजय विठ्ठल पोटे (रा. परतूर, जि. जालना), साहेबराव लक्ष्मण गाडेकर (रा. सातोना, ता. परतूर), ज्ञानेश्वर आत्माराम लहाने (रा. आहेर बोरगाव, ता. सेलु), अजय संपत बीडवे (रा. सातोना, ता. परतूर) आणि अंकुश बजरंगलाल जैस्वाल (रा. सातोना, ता. परतूर, जि. जालना) यांचा समावेश आहे.
हे आरोपी परभणी आणि जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील रहिवासी असल्याने या जुगार अड्ड्याचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ५ हजार ९८० रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, वेगवेगळ्या कंपन्यांचे ९ मोबाईल फोन आणि २ दुचाकी वाहने असा एकूण १ लाख २ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने आणि मोबाईल जप्त केल्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या या गुन्ह्यातील फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोह थोरे हे करत आहेत. आरोपींना कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.