

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
साकोरा येथे वरिष्ठ निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी येत असलेल्या एका शिक्षकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी घडली. या शिक्षकाला उपचारासाठी मालेगाव येथे घेऊन गेलेल्या अन्य तीन शिक्षकांच्या कारलाही परत येताना जाटपाडे शिवारात अपघात झाला.
यात तिन्ही शिक्षक जखमी झाले असून, त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे शिक्षकवर्गात हळहळ व्यक्त होत आहे. आमोदे येथील श्री साई शिक्षण संस्था संचालित कै. वा. सो. पगार विद्यालयातील प्राध्यापक आबासाहेब हिम्मतराव शिरसाठ (४८) हे साकोरा येथे सात दिवसांपासून नियमित होत वरिष्ठ निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी येत होते.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे येत असताना तळवाडे गावाजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. सोबत असलेल्या शिक्षक मित्रांनी प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने चारचाकी वाहनातून मालेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, आबासाहेब शिरसाठ यांना उपचारासाठी घेऊन गेलेल्या त्याच चारचाकी वाहनातून परत येत असताना, जाटपाडे शिवारात त्यांच्या कारला अपघात झाला. यात अमोल गंगेले (४४), नितीन अहिरे (३८) आणि तुषार मेतकर (३८) हे तीन शिक्षक जखमी झाले.
शिक्षकवर्गातून हळहळ
प्रा. आबासाहेब शिरसाठ यांच्या निधनाने आमोदे परिसरासह साकोरा येथील प्रशिक्षणार्थी शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे. एकीकडे सहकारी शिक्षकाच्या निधनाचे दुःख आणि दुसरीकडे त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांच्या वाहनाचा अपघात, अशा दोन घटनांनी शिक्षकवर्गाला मोठा धक्का बसला आहे