

नांदगाव (प्रतिनिधी) :
Nashik Nandgaon Kidnapping Case: नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी, बाभुळवाडी येथून आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मन्याड परिसरात खळबळ उडाली असून, नांदगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मन्याड चौकी बाभुळवाडी येथे राहणाऱ्या अपहरण झालेल्या चिमुकलीच्या वडिलांनी याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीला कायदेशीर कस्टडीतून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पहृत चिमुकलीचे वय आठ महिने आहे. तिचा जन्म १५ जानेवारी २०२६ रोजी झाला आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिमुकलीचा रंग गोरा असून शरीरयष्टी बारीक आहे. चेहरा लांबट, केस काळे व लांब असून उंची अंदाजे दीड फूट आहे. अपहरणाच्या वेळी तिच्या अंगात निळ्या रंगाचा ड्रेस होता.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि. बालाजी शेंडगे करीत आहेत. दरम्यान, आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या अपहरणाच्या घटनेने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.