

TCS Nashik Case: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) नाशिक युनिटशी संबंधित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कंपनीने पहिल्यांदाच अधिकृत भूमिका मांडत स्पष्ट केलं की, त्यांच्या अंतर्गत यंत्रणांमध्ये अशा कोणत्याही तक्रारीची नोंद नाही.
TCS च्या म्हणण्यानुसार, नाशिक युनिटमधील उपलब्ध सिस्टीम आणि रेकॉर्डची प्राथमिक तपासणी करण्यात आली. पण त्यामध्ये या प्रकारच्या आरोपांशी संबंधित कोणतीही तक्रार आढळलेली नाही. कंपनीच्या एथिक्स चॅनल किंवा POSH (लैंगिक छळ प्रतिबंध) प्लॅटफॉर्मवरही अशी कोणतीही नोंद नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी कंपनीने स्वतंत्र ओव्हरसाईट कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कमिटीची जबाबदारी कंपनीचे स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय, चौकशी अधिक पारदर्शक व्हावी यासाठी बाह्य संस्थांचाही समावेश करण्याचा विचार सुरू आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. यामध्ये एका महिला HR प्रमुखाचाही समावेश आहे. तर निदा खान नावाची एक कर्मचारी सध्या फरार असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार उघड झाला. तक्रारदार महिलेने आपल्या सहकर्मी दानिश शेखवर आरोप केला की, 2022 मध्ये लग्नाचं आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, मात्र तो आधीपासूनच विवाहित होता.
या प्रकरणात दानिश शेखची बहीण निदा खान हिच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तिने तक्रारदारावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आणखी 7 महिलांनीही पुढे येत वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे.
सध्या एकीकडे गंभीर आरोप आणि पोलिस तपास सुरू असताना, दुसरीकडे TCS ने आपल्या अधिकृत नोंदींमध्ये कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निर्णय काय लागतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.