

नाशिकः टीसीएस महिला कर्मचाऱ्यांचे कथित लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मातर प्रकरणातील पहिल्या गुन्ह्याचे आरोपपत्र चालू आठवड्यात न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर उर्वरित आठ गुन्ह्यांमधील आरोपपत्र पुढील आठवड्यात सादर केले जाणार असल्याने या बहुचर्चित आणि संवेदनशील प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेकडून सर्व पुरावे आणि तांत्रिक माहितीची पडताळणी अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
निदा खान, अश्विनी चेनानी, तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरूख हुसैन शौकत कुरेशी आणि रझा रफिक मेमन हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. टीसीएस आयटी कंपनीतील या प्रकरणातील संशयित सहाय्य आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील पहिला गुन्हा देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाची सूत्रे हाती घेतली होती. या प्रकरणात दानिश हा मुख्य आरोपी मानला जात असून, त्याच्यासह इतर संशयितांची भूमिकाही तपासादरम्यान समोर आल्याचे सांगितले जात आहे.
एसआयटीकडून मागील काही आठवड्यांपासून पीडित महिला कर्मचाऱ्यांचे जबाब, डिजिटल पुरावे, मोबाइल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, सोशल मीडिया संपर्क तसेच संशयित आरोपींमधील परस्पर संबंध यांची सखोल पडताळणी करण्यात आली आहे. तपासादरम्यान काही महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबाव, धार्मिक परिवर्तनासाठी सक्ती तसेच लैंगिक शोषणास सामोरे जावे लागल्याचे आरोप समोर आले होते. याशिवाय काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, हॉटेलमधील नोंदी, मोबाइल चॅट्स आणि लोकेशन तपासाचाही तपासात समावेश करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, पहिल्या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर उर्वरित आठ गुन्ह्यांतील पुरावे आणि तपास पूर्ण करून पुढील आठवड्यात न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे. या प्रकरणात अनेक आरोपी, पीडित महिला आणि विविध प्रकारचे तांत्रिक पुरावे असल्याने तपास अत्यंत बारकाईने करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपपत्रात अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.