

नाशिक : अलीकडच्या काळातील निवडणुका खूप संशयास्पद होत आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे मांडले, त्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही. हरियाणा पुन्हा भाजपकडे जाते, हे कसे होऊ शकते? शंका घेण्यास अनेक जागा आहेत. शंकांचे निरसन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र, निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही, असा आरोप माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. शरद पवारांना भेटणारे ते दोघे ईव्हीएम हॅक करणारे असावेत असे सांगत, शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघाबाबत हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झाल्याचा आरोपही थोरात यांनी केला आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी माजी मंत्री थोरात शनिवारी (दि. ९) नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा दिला. ते म्हणाले की, शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे असे काही एजंटच फिरत असतील, तर ईव्हीएम संदर्भातही प्रश्न निर्माण होतो. अत्यंत निरपेक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणे अत्यंत गरजेचे आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, ही शंका सर्वदूर जनतेच्या मनात आहे, असे थोरात यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने आधीच डिजिटल स्वरूपात राहुल गांधींना माहिती दिली असती, तर अनेक चोऱ्या लवकर समोर आल्या असत्या. निवडणूक आयोगानेच लोकशाहीचा खात्मा करायचा ठरवले आहे. त्यामुळे भविष्यकाळात जनतेने आता हा विषय हातात घेणे गरजेचे आहे, असे थोरात यांनी सांगितले.
संगमनेर मतदारसंघात अनेक ठिकाणी खोटे मतदान नोंदवले गेले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात असाच मतदार नोंदणी घोटाळा झाला आहे. संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जी माहिती मागितली, ती दिली गेली नाही. निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही, असा आरोप थोरात यांनी केला .
एक लाख ३० हजार कोटींचे निरनिराळ्या योजनांचे देणे आहे. ठेकेदार आत्महत्या करत आहेत. संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना निराधार लोकांसाठी आहे. त्यांना मागच्या आठ महिन्यांत पैसे मिळालेले नाहीत, असा आरोप करत सिंहस्थासाठी निधी मिळत नाही याचा अर्थ राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. ही वस्तुस्थिती आता नाकारता येणार नाही, असे थोरात यांनी सांगितले.