

संगमनेर: संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे. त्यांचा विचार हा सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे. मराठा शब्द हा महाराष्ट्रातील सर्वांसाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांचा समतेचा विचार ते सांगत होते. मात्र जातीय तेढ निर्माण करणार्या पक्षांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये विविध पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष व शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन तीव्र निषेध केला. हा भ्याड हल्ला करणारा काटे हा मुखवटा असून त्या मागील खरे सूत्रधार ओळखा, असे आवाहन करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. (Latest Ahilyanagar News)
संगमनेर बसस्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा यावेळी काढण्यात आला. या मोर्चामध्ये छात्र भारती व राष्ट्रसेवा दलाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.याप्रसंगी थोरात म्हणाले की, भाजप व आरएसएसचा शिवधर्म खरा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवेहलना झाली.
त्यावेळी त्यांचे लोक एक शब्द सुद्धा बोलले नाही. महाराजांबद्दल भाजपच्या अनेक पदाधिकार्यांनी अपशब्द वापरले . त्यावेळेस सत्ताधारी बोलले नाही. त्यांनी जातीय राजकारणासाठी वेगवेगळी व्यासपीठ निर्माण केली आहे. त्यामधून ती जातीय विष पेरत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. तसेच उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही सुरू आहे. माध्यमांनी जर वेळीच योग्य भूमिका घेतली नाही तर भारतामध्येही उत्तर कोरिया सारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीतीही वयक्त केली.
माजी आ.डॉ तांबे यांनी, युवकांनी एकत्र येऊन अशा देश विघातक शक्तींना थांबवण्यासाठी विचारांची जोरदार लढाई करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
तर डॉ जयश्रीताई थोरात यांनी भाजपने जन सुरक्षा कायदा हा भाजप रक्षा कायदा केला आहे, अशी टीका करून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली. अनिकेत घुले म्हणाले की, हल्ले करणारे हे भिडे गुरुजी समर्थक आहेत तर आपण साने गुरुजी समर्थक आहोत.
यावेळी शिवसेनेचे अमर कतारी, प्रा. हिरालाल पगडाल, प्रा. उल्हास पाटील, अजय फटांगरे, दत्ता ढगे, किरण रोहम यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवकांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. यावेळी राहुल जराड, गणेश जोंधळे, विशाल शिंदे, मोहम्मद तांबोळी, गाथा भगत, मशिरा तांबोळी, सुमित खरात, अनिकेत खरात, अभिषेक वैराळ, सचिन आहेर, वैष्णव मुर्तडक आदी उपस्थित होते. हे निवेदन प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे उपस्थित होते.