

संगमनेर: 1985 ते आतापर्यंत संगमनेर शहर हे अत्यंत सुरळीत चालले. विकासाच्या अनेक योजना राबवल्या गेल्या. शांतता, बंधुभाव, सुव्यवस्था आणि आनंदाचे वातावरण हे संगमनेरचे वैशिष्ट्य राहिले असून ही संस्कृती आपल्याला टिकवायची आहे. मात्र मागील काही काळामध्ये दहशत, गुंडगिरी वाढत चालली असून काही मंडळी शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा शक्तींना आपल्याला एकत्रित होऊन रोखायचे आहे, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सुदर्शन निवासस्थानी संगमनेरमधील विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होत.े यावेळी डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, इसाक खान पठाण, अरुण वाकचौरे सोमेश्वर दिवटे, डॉ. जयश्रीताई थोरात, निखिल पापडेजा, किशोर पवार, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.(Latest Ahilyanagar News)
माजी मंत्री थोरात म्हणाले की, 1991 मध्ये डॉ. सुधीर तांबे हे नगराध्यक्ष झाले आणि तेव्हापासून संगमनेर शहर हे अत्यंत काळजीपूर्वक आणि सुंदर सांभाळले. एकही आरोप कधी झाला नाही. प्रत्येक नगराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात अत्यंत चांगले काम केले.
दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेने स्वच्छतेसाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर 10 कोटींचे बक्षिसे मिळवले. सुंदर व स्वच्छ शहर म्हणून संगमनेरचा लौकिक असून झाडांचे शहर असलेल्या संगमनेर मध्ये 40 गार्डन आहेत. निवडणूक संपली की विरोधक म्हणून आपण कुणाला कधी पाहिले नाही. सर्वांना बरोबर घेतले. चुकीचे असेल त्याचा बंदोबस्त केला. सुरक्षितता व बंधुभाव असलेले हे शहर सुकून असलेले शहर म्हणून नावारूपास आले.
निळवंडे धरण हे आपण केले असे आवर्जून सांगताना निवडणुका येतात जातात, मात्र कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होऊ नये. झालेल्या पराभवातून धडा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यापुढे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, जनता सोबत असल्याने नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये विजय आपलाच होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ जयश्री थोरात, हिरालाल पगडाल, दिलीप पुंड, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, किशोर पवार, ओंकार भंडारी, इसाक खान पठाण, यांनीही आपली मनोगत व्यक्त केली.
विरोधकांचे कॉलेज आपणच मंजूर केले!
शहर कुठे चालले आहे हा चिंतेचा विषय आहे. हनुमान जयंतीला लोटालोट कोणी केली, सोशल मीडियावर चुकीचे टाकले जात आहे. एजन्सी लावून संगमनेरला बदनाम केले जात आहे. हे एवढे फ्लेक्स येतात कुठून समजून घ्या. शहरांमध्ये गुंडगिरी वाढत आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहे .वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी परिस्थिती पूर्वी कधी नव्हता. विरोधकांची कॉलेज आपण मंजूर केले. अनेक विरोधकांचे उद्घाटने, भूमिपूजने मी केली. चांगले वातावरण ठेवले, असेही आवर्जून सांगितले.