

देवळाली कॅम्प : परिसरात भटक्या श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भटके श्वान पकडण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून ठेकेदार नेमण्यात आलेला असतानाही त्रास कमी होत नसल्याने ठेकेदार बदलण्याची मागणी छावा मराठा संघटना मुस्लीम आघाडी प्रदेशाध्यक्ष राशिद सय्यद व शेख फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष जहांगीर शेख यांनी केली आहे.
भटक्या श्वानांचा त्रास देवळालीकर नागरिकांना सहन करावा लागत आहे. वॉर्ड क्रमांक एक मधील धिवरे बंगला ते जैन बंगला, दोंदे बिल्डिंग, छापरू हॉल, काळे चाळ, हाडोळा, नूर वीला, लॅम रोड, आनंद रोड स्वादी हॉस्पिटल, गवळीवाडा, दांडीबाई हॉल येथे भटक्या श्वानाने ज्येष्ठ नागरिकांना चावा घेऊन जखमी केलेले आहे.
लहान बालकांनाही या भटक्या श्वानांचा मोठा त्रास होत असून, आई-वडिलांना आपली लहान बालके सुरक्षित राहतील की नाही, अशी चिंता सतावत आहे. मिठाई स्ट्रीट येथे एकाच श्वानाने 15 दिवसांत तब्बल 14 लोकांना चावा घेतला आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
प्रशासनाने अशा भटक्या श्वानांना पकडण्यासाठी ठेकेदाराचीदेखील नियुक्ती केलेली आहे; मात्र त्याविषयी नागरिकांना माहितीच नाही, असा ठेका दिला असल्यास व ते काम करत नसल्यास ठेकेदार बदलण्यात यावा व जनतेला त्रासातून मुक्त करावे. अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा राशिद सय्यद व जहांगीर शेख यांनी दिला आहे.
कोर्टाची कठोर टिप्पणी
सुप्रीम कोर्टाने भटक्या श्वानांशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कठोर टिप्पणी केली. भटक्या श्वानांनी चावा घेतल्याची प्रत्येक घटना आणि त्यामुळे होणारा प्रत्येक मृत्यू रोखण्यासाठी राज्य शासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने पुरेसे प्रयत्न केले नाहीत, तर त्यांच्यावर मोठा दंड आकारला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.