

आन्वा : मकर संक्रांतीला महिलावर्ग पर्यावरणपूरक वाण देण्याची पूर्वी परंपरा होती. त्याला मातीचे सुगडे देऊन पूजले जात होते. मात्र, हा प्रकार म्हणजे जुने बुरसटलेले विचार मानून या पर्यावरणपूरक ताणाकडे पाठ फिरविली आहे. त्या जागेवर प्लास्टिकच्या वस्तू खरेदी केल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. बाजारात सुगडे खरेदीसाठी शुकशुकाट आणि प्लास्टिकचे वाण खरेदी करण्यासाठी गर्दी होताना आन्वा परिसरात पहायला मिळत आहेत.
संक्रांत हा सण वर्षातील सर्वात पहिला सण असून यंदा मकरसंक्रांत ही एकदशीच्या दिवशी आल्याचे योग पहिल्यांदाच आला आहे. त्यामुळे पारंपारिक वाण देण्यास पाठ फिरवली आहे. यानिमित्ताने हळदी कुंकवासाठी महिलांना निमंत्रित केले जाते. विशेष हा काळ मकर संक्रमणाचा आहे. याच काळात सूर्य दक्षिणायनातून उत्तरा आयणात प्रवेश करतो. यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे. त्यात प्राचीन काळी पर्यावरणपूरक मकर संक्रांती साजरी होत होती. त्यात मातीचे सुगडे दिले जात होते.
त्यात भेटवस्तू स्वरुपात तिळगुळ, बोर, शेंगदाणे, गाजर, ऊस, गहू यासारख्या वस्तू त्यात भरून दिल्या जात होत्या. शेत शिवारातील या वस्तुवाणाच्या स्वरुपात दिल्या जात होत्या. त्यामुळे शेत शिवारातील समृद्धीचे प्रतीक असलेले पीक या निमित्ताने प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचत होते. ही व्यापक पर्यावरणपूरक भेटवस्तू मानली जात होती कालातराने या भेटवस्तू देण्यात प्रकारात बदल झाला आहे. प्रत्येक गावात पारंपरिक बियाणे आजही आहे.
मात्र हे बियाणे त्या घरापर्यंत मर्यदित आहे. आता हे बियाणे अनेकांच्या घरात पोहोचायला हवे. वाल, कोवळे, दोडके, कारले, टमाटर, निवर्डींग, लाल पांढऱ्या बोड्या, माठ, यासारखे विविध भाज्यांचे प्रकार गावात आहे. हे बियाणे संक्रांतीच्या निमित्ताने वितरित केले तर त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल आणि प्रत्येक घरापर्यंत परंपरागत पद्धतीचे बियाणे पौष्टिकता देणारे ठरेल.
यावर्षी मकर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आले असल्याने महिलांमध्ये गोंधळ वाढला आहे. वाणाच्या बदललेल्या वेळेमुळेही महिलांमध्ये संभ्रम दिसून आला. अनेक मंदिरासमोर बुधवारी वाण देण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.