

नाशिक : महापालिकेच्या 31 प्रभागांमधील 122 जागांच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (दि.16) मतमोजणी होणार असल्याने मतदानाची तयारी करण्याबरोबरच प्रशासनाने मतमोजणीचीही सज्जता ठेवली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांतच अर्थात दुपारी 12 पर्यंत नाशिककरांचा कौल कुणाच्या पारड्यात हे स्पष्ट होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.15) मतदान होत असून, दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारीला मतमोजणीद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी तब्बल आठ हजार 800 अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली असून, मतदान आणि मतमोजणीच्या कामाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी शहरात विविध ठिकाणी तब्बल 1,563 मतदान केंद्रांची उभारणी केली जाणार असून, तब्बल 1,563 कंट्रोल युनिट व 4,650 बॅलेट युनिटची व्यवस्था केली जाणार आहे. मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला मतमोजणीद्वारे निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. यासाठी नऊ ठिकाणी दहा मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक - मतमोजणीचे ठिकाण
1, 2, 3 -विभागीय क्रीडा संकुल (मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी)
4, 5, 6 विभागीय क्रीडा संकुल (मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी)
7, 12, 24-दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका
13, 14, 15-वंदे मातरम् सभागृह, डीजीपीनगर, नाशिक
16, 23, 30 -अटल दिव्यांग स्वाभिमान भवन, मुंबई नाका
17, 18, 19-शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव रोड, नाशिक
20, 21, 22-नाशिकरोड विभागीय कार्यालय, दुर्गा गार्डन शेजारी, नाशिकरोड
25, 26, 28-प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड पोलिस स्टेशन मार्ग, सिडको
27, 29, 31-राजे संभाजी स्टेडियम, सिडको
8, 9, 10, 1- सातपूर क्लब हाउस, सातपूर