

Smart parking contract in dispute again
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेला २८ ठिकाणी स्मार्ट पार्किंग उभारण्याचा ठेका पुन्हा एकदा वादात अडकला आहे. या ठेक्याच्या निविदा अटी-शर्तीवर शिवसेना (शिंदे गटा) ने आक्षेप घेतला आहे. ठेक्यासाठी राबविण्यात आलेल्या एकत्रित निविदेमुळे एकाधिकारशाही निर्माण होण्याचा धोका व्यक्त करत ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी केली आहे.
शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २२ ऑनस्ट्रीट आणि सहा ऑफस्ट्रीट अशा २८ पार्किंग सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी एकत्रित निविदा काढली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला गेल्या स्थायी समिती आणि महासभेने मंजुरी दिली असून, पार्किंग योजनेअंतर्गत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी १० ते ६० रुपये, तर चारचाकी वाहनाकरिता २० ते १०० रुपयांपर्यंत तासानुसार दर आकारले जाणार आहेत. यापूर्वी दोन ते तीन वेळा ही निविदा काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र महापालिकेला दरमहा उत्पन्न देण्याच्या अटीवर ठेकेदारांनी आक्षेप घेतला होता. भाजपच्या एका आमदाराने मध्यस्थी केल्यानंतर निविदा अटी-शर्तीत बदल झाला. मात्र, या अटी-शर्तीना महानगरप्रमुख तिदमे यांनी आक्षेप घेतला आहे.
तिदमे यांनी यासंदर्भात आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन सादर करून सदर निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. २८ ठिकाणांच्या एकत्रित पार्किंग निविदेमुळे स्थानिक आणि छोट्या ठेकेदारांवर, बेरोजगारांवर अन्याय होत आहे. निविदेमुळे लहान व मध्यम ठेकेदारांना स्पर्धेतून वगळले गेले असून, मोठ्या कंपन्यांना अनुकूल अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत, निविदेमधून एकाधिकार निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या पपया नर्सरी सिग्नल ते एक्सएलओ चौक आणि तेथून पुढे गरवारे चौक या दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेलादेखील तिदमे यांनी आक्षेप घेतला आहे. या दोन्ही रस्त्यांवरील मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होते. मात्र, या निविदेत या भारवाहक वाहतुकीचा आणि तांत्रिक मानकांचा विचार करण्यात आलेला नाही. भारवाहक रस्त्यांचे डिझाइन करताना इंडियन रोड्स काँग्रेस (आयआरसी) आणि रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ईएसएएल (इक्विव्हॅलेंट सिंगल अॅक्सल लोड) आणि सीबीआर (कॅलिफोर्निया बिअरिंग रेशो) या चाचण्या बंधनकारक आहेत. मात्र, या चाचण्यांचा आणि वाहतूक भाराचा कोणताही उल्लेख निविदेत नाही, असे आक्षेप तिदमे यांनी घेतले आहेत.