

Special ticket checking campaign at eight stations in Bhusawal railway division
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
भुसावळ यात्रेकरूंना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवास करता यावा तसेच बिनतिकीट व अनधिकृत प्रवासाला आळा बसावा यासाठी भुसावळ विभागामार्फत तपासणी मोहिमा राबविल्या जातात. १५ ऑक्टोबर रोजी भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिकरोड, खंडवा, अकोला, बडनेरा व अमरावती या प्रमुख स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात सुमारे ६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
मोहिमेत तिकीट तपासनीस, वाणिज्य पर्यवेक्षक व रेल्वे सुरक्षा दल अशा एकूण ७२ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला, मोहिमेदरम्यान ९४८ बिनतिकीट व अनियमित प्रवास प्रकरणांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. चार प्रवाशांवर धूम्रपान केल्याबद्दल आणि तीन अनधिकृत विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली. भुसावळ विभागात मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी मोहीम राबविले जाते. यामध्ये स्थानक तपासणी, अचानक धाड तपासणी, किलाबंदी तपासणी, व्यापक तपासणी व मेगा तिकीट तपासणी मोहिमा अशा विविध पद्धतींचा समावेश असतो.
प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करताना नेहमी वैध तिकीट खरेदी करून जबाबदारपणे प्रवास करावा. बिनतिकीट प्रवासाबाबत रेल्वेचे 'शून्य सहिष्णुता' धोरण कायम असून, सर्व प्रवाशांना सुरक्षित व सन्मानजनक प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.