

Municipal Commissioner on the road for 'pothole-free Nashik'
नाशिक : पुढारी वृत्तसेवा 'खड्डेमुक्त दिवाळीत नाशिक'साठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री या स्वतः अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरल्या असून, रस्ते दुरुस्तीच्या मोहिमेला वेग आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील ७० टक्के खड्डे डांबरी मिश्रणाने बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे.
पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांना लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आयुक्त खत्री यांना दिवाळीपर्यंत नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेने रस्ते दुरुस्ती मोहिमेला सुरुवात केली. महापालिका आयुक्त खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी स्वतः रस्त्यावर उतरत दुरुस्ती कामांची पाहणी केली. त्यामुळे रस्ते दुरुस्ती कामांना वेग आला आहे.
पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १५ मधील जनरल वैद्यनगर परिसर तसेच नंदिनी नदी रस्त्यालगतचे खड्डे दुरुस्त करण्यात आले. वडाळा-पाथर्डी रोडवरील पापामिया फार्म परिसरात काम सुरू करण्यात आले. पश्चिम विभागातील वेस्टसाइड मॉल येवलेकर मार्ग रस्त्यालगतचे खड्डे दुरुस्त करण्यात आले. पंचवटी विभागात प्रभाग क्रमांक सहामधील आसाराम बापू पूल ते शासकीय रोपवाटिका पूल या रस्त्यावरील खड्डे व पॅचेस भरण्यात आले असून, डांबरीकरण पूर्ण झाले आहे. प्रभाग क्र. दोनमधील शाळेला लागून रस्त्यावरील खड्यांचे भरणेही पूर्ण करण्यात आले. सातपूर विभागातील महादेव मंदिर राजेश्वरी चौक श्रमिकनगर रस्त्यालगतचे खड्डेड् दुरुस्त करण्यात आले आहेत.
सिंहस्थाच्या निमित्ताने ९३० कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त मनीषा खत्री यांनी ठेकेदारांची नुकतीच बैठक घेतली. त्यात स्पर्धात्मक दर भरण्याचे आवाहन करताना निविदा मॅनेज होणार नसल्याचे आश्वासन दिले. अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.