

मृत सर्व जण मध्य प्रदेशातील रहिवासी
मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जामनेर तालुक्यातील माल दाभाडी गावाजवळ भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुर्ड्याससह सहा जणांचा जागीच अंत झाला. एकाच दुचाकीवरून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडे निघालेल्या दोन पुरुष, एक महिला आणि तीन बालकांवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सर्व मृत नागरिक मध्य प्रदेशातील रहिवासी होते. ते जामनेर परिसरार मोलमजुरीसाठी राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरपासून जवळ असलेला माल दाभाडी शिवारातील मुख्य रस्त्यावरून जात असताना सायंकाळच्या सुमारास भरधाव मालवाहतूक ट्रक (एच.आर. ५५ ए.के. ५२३२) आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची (एम.पी. ६८ झेड.एफ. ३३४०) यातरोसमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील प्रवाशांचा अक्षरशः चेंदामένदा झाला. यामध्ये दोन पुरुष, एक महिला आणि तीन लहान बालकांचा समावेश आहे. मृतांमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या तानुल्या बाळाचाही समावेश असल्याने घटनास्थानावरील दृश्य पाहून उपस्थांचे डोळे पाणावले होते.
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तत्काल घटनास्थळी धाव घेतली.मात्र, तोपर्यंत सहाही जणांचा श्वास थांबला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जामनेर पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला. सर्व सहाही मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मृत व्यक्तींमध्ये रामा सुरशिंग भिलाले (२६), शिमला रामा भिलाले (२२), पुज्या रामा भिलाले (५), भरती रामा भिलाले (३), श्रवण रामा भिलाले (३ महिने), चंपालाल रेवणशिंग भिलाले (२८, रा. सर्व मालची तांडा, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण बऱ्हाणपूरकडे जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. भरधाव ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.