

सिन्नर : ज्या नागरिकांच्या नावे स्वतःचे घर नाही, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही सुवर्णसंधी आहे. केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा सिन्नर शहरातील प्रत्येक गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी केले.
सिन्नर नगर परिषद कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत शिबिरात बोलत होते. शिबिराला मुख्याधिकारी अभिजीत कदम, गटनेते सागर भाटजिरे, मनोज देशमुख तसेच नगरसेवक व नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरास शहरातील नागरिक, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनेबाबत माहिती घेतली.
नगर अभियंता सौरभ गायकवाड यांनी प्रास्ताविकात प्रधानमंत्री आवास योजनेतील विविध घटकांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसेच ऑनलाइन अर्ज कसा भरावा, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
नगरसेवक उदय गोळेसर यांनी ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी कशा सोडवाव्यात, याबाबत माहिती दिली. योजनेच्या विविध घटकांची माहिती सुदर्शन लोखंडे व रोशन चव्हाण यांनी लाभार्थ्यांना समजावून सांगितली.
शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगरसेविका ललिता हांडे, कांताबाई जाधव, नगरसेवक सुदर्शन नाईक अजय गोजरे, आशिष गोळेसर, पंकज मोरे, शुभम वारुंगसे, सागर कोथमिरे, विलास जाधव आदींसह नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने होते.
प्रधानमंत्री आवास योजना ही केवळ घर बांधण्याची योजना नसून, गरिबांच्या सुरक्षित भविष्याचा पाया आहे. पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.
अभिजित कदम, मुख्याधिकारी