

नाशिक : आसिफ सय्यद
नाशिक महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून कुंभमेळामंत्री गिरीश महाजन मैदानात उतरले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या निष्ठावंतांची यशस्वी मनधरणी करत, नव्या-जुन्यांची मोट बांधून भाजपच्या विजयासाठी महाजन यांनी थेट नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. 100 प्लसचा भाजपचा नारा प्रत्यक्षात उतरणार का, केंद्र व राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेवरही भाजपची सत्ता येणार का, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
केंद्र व राज्यात भाजपप्रणीत महायुतीची सत्ता असून, मागील पंचवार्षिकमध्ये नाशिक महापालिकेतही भाजप सत्तेवर होता. त्यामुळे यंदाही महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. कुंभनगरी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची सिंहस्थ कामे सुरू असून, गत सिंहस्थात पालकमंत्री म्हणून महाजन यांनी केलेल्या यशस्वी नियोजनामुळेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्याच्या ध्येयाने महाजन यांनी सूत्रे हातात घेतली. केंद्र व राज्यात सत्ता असल्याने महापालिकेतही भाजप सत्तेवर येईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज असल्याने भाजपच्या तिकिटासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली. 100 प्लसचा नारा दिल्यानंतर विजय जवळ आल्याची भावना बळावली आणि त्यातूनच एबी फॉर्म वाटपावरून पक्षात गोंधळ उडाला. फॉर्मची पळवापळवी, निष्ठावंतांची नाराजी, भावनिक उद्रेक यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिककडे वेधले गेले.
या कठीण परिस्थितीत महाजन पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून पुढे आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत नाशिकमध्ये ठाण मांडून त्यांनी नाराजांची समजूत काढली आणि डॅमेज कंट्रोल साधले. बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या अनेक निष्ठावंतांनी महाजन यांच्या मध्यस्थीनंतर अर्ज मागे घेतल्याने अनेक प्रभागांतील भाजप उमेदवारांची कोंडी सुटली आहे.
मुख्यमंत्र्यांची 11 जानेवारीला सभा
या निवडणुकीत भाजपने 116 उमेदवार मैदानात उतरवले असून, गोंधळात एबी फॉर्म बाद झाल्याने प्रभाग क्रमांक 25 मध्ये दोन अपक्ष उमेदवारांना भाजपने पुरस्कृत केले आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या 11 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे.
त्रिसूत्रीचा करिष्मा चालणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा चेहरा आणि गिरीश महाजन यांचा राजकीय करिश्मा या त्रिसूत्रीचा भाजपला कितपत फायदा होणार, 100 प्लसचे स्वप्न साकार होणार का, नाशिक मनपात पुन्हा भाजपची सत्ता येणार का, याची उत्सुकता आता संपूर्ण नाशिकमध्ये शिगेला पोहोचली आहे.