

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांमध्ये समन्वयाचा अभाव, अपूर्ण नियोजन आणि सुरक्षेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याची तक्रार करत आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी मंगळवारी (दि. ५) मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला, दरम्यान, आमदारांच्या तक्रारींची दखल घेत येत्या आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आश्वासन आयुक्त खत्री यांनी दिले आहे.
सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले, कामांच्या ठिकाणी माहिती फलक नसणे, ठेकेदारांकडून अनियोजित खोदकाम करणे तसेच काँक्रीट रस्त्यांसोबत वीजतारा भूमिगत न करण्यामुळे भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. गटारे, पाणीपुरवठा, एमएनजीएल आदी विभागांमध्ये समन्वय नसल्याने एकाच रस्त्याचे वारंवार खोदकाम होत असल्याचेही समोर आले. काही ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याने अपघात होऊन दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाबही मांडण्यात आली.
अचानक खोदकामामुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय वाढत आहे. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेतच दिवसेन्दिवस रखडलेली असून, काही ठिकाणी मर्यादित वेळेत कामे केल्याने ती विलंबित होत असल्याची टीका करण्यात आली. त्यामुळे कामे जलदगतीने पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. पर्यायी मार्गाची व्यवस्था न करता रस्ते बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच खड्डे भरताना योग्य तांत्रिक पद्धतींचे पालन न करता केवळ माती टाकली जात असल्याने पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अधिक बिघडण्याची शक्यता व्यक्त झाली.
आयुक्त साधणार समन्वय
आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व तक्रारींची दखल घेत संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. तसेच कामांची स्थिती व सुधारणा याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.