

नाशिक : नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची शतकभराची समृद्ध आणि वैभवशाली परंपरा दुर्मीळ छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडणाऱ्या 'सिंहस्थ संस्कृती' या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२८) झाले. प्रदर्शनाची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी छायाचित्रांचे कौतुक केले. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाइन हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
गुरुदक्षिणा हॉल येथील डॉ. सुनंदा म. गोसावी आर्ट गॅलरी येथे ३० ऑगस्टपर्यंत प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके, भक्ती चरणदास महाराज, नगरसेवक सुरेश पाटील, दिनकर पाटील आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाइन हिल्सचे अध्यक्ष अभय नेरकर, प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक धनंजय बेळे, सचिव हर्षद बेळे, अजय चव्हाण, अध्यक्ष सतीश काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच पालकमंत्री महाजन यांचे स्वागत केले.
प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे १९३२ पासूनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची दुर्मीळ आणि अप्रकाशित छायाचित्रे आहेत. नाशिकसह देशभरातील १५ हून अधिक पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर्सनी जतन केलेल्या या छायाचित्रांमधून नाशिकच्या सिंहस्थ परंपरेचा जणू दृक्-इतिहासच उलगडला आहे. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्रद्धेच्या महासंगमाची दृश्यगाथा
सिंहस्थ हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय संस्कृतीतील विविध प्रवाहांचा महासंगम आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून नाशिकमध्ये येणारे साधुसंत, महंत, भाविक, वारकरी आणि विविध पंथांचे अनुयायी यांच्या माध्यमातून कुंभमेळ्यातील भारतीय लोकजीवनातील विविधता अनुभवता येते. हीच व्यापकता 'सिंहस्थ संस्कृती' प्रदर्शनातून प्रभावीपणे मांडली आहे. एका बाजूला अध्यात्म आणि श्रद्धा, तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन समाजजीवन; एका छायाचित्रात संतपरंपरेचे दर्शन, तर दुसऱ्यात लाखो भाविकांच्या उत्साहाची अनुभूती, अशा विविध छटांनी प्रदर्शन सजले आहे
चित्रमय वैशिष्ट्ये
१९३२ पासूनच्या सिंहस्थाच्या दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश
अनेक छायाचित्रे अप्रकाशित आणि दुर्मीळ
१५ हून अधिक पत्रकार व प्रेस फोटोग्राफर्स यांच्या संग्रहातील छायाचित्रे
जुन्या नाशिकचे रूप, आखाडे, साधुसंत आणि शाही स्नानाचे दर्शन
तत्कालीन सामाजिक जीवन, वेशभूषा आणि वाहतूक व्यवस्थेच्या आठवणी
सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासाचा दृक-दस्तऐवज