

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामसाठी २६८ एकर जागेच्या कायमस्वरूपी संपादनासाठी महापालिकेतर्फे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांना येत्या मंगळवारी (दि. २२) प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या प्रस्तावाद्वारे साधुग्रामच्या भूसंपादनाकरीता पाच पर्याय सुचविले जाणार आहेत. यात ५० टक्के रोख व ५० टक्के टीडीआर स्वरूपात मोबदल्याच्या पर्यायाचा समावेश आहे.
नाशिकमध्ये येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थात यंदा दोन लाख साधु-महंत व दहा कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. साधु-महंतांच्या निवासव्यवस्थेसाठी तपोवनात साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. या साधुग्रामच्या उभारणीसाठी सुमारे १ हजार एकर जागेची आवश्यकता भासणार आहे. सद्यस्थितीत तपोवानात साधूग्रामसाठी २८०.४६ एकर व संलग्न सुविधांसाठी ९७.०५ एकर जागा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
९४.०७ एकर महापालिकेने ताब्यात घेतली असून २८३ एकर क्षेत्र संपादन बाकी आहे. १३ एकर क्षेत्रात जनार्दन स्वामी मठ व लक्ष्मीनारायण मंदिराची लक्ष्मी गोशाळा आहे. १.५ एकर क्षेत्रात अभिन्यास मंजूर आहे. २६८ एकर जागा संपादित केली जाणार आहे. ही जागा रोख मोबदला देऊन ताब्यात घ्यायची ठरली तर, किमान साडेचार हजार कोटी रुपये द्यावे लागतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर महापालिकेकडे निधी नसल्याने भूसंपादनाकरीता पाच पर्यायांची आखणी करण्यात आली आहे. मंगळवारच्या (दि.22) बैठकीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयासमोर हे सर्व प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याचा निर्णय घोषित केला असल्यामुळे प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.
५० टक्के रोख आणि ५० टक्के टीडीआरद्वारे मोबदला
५० टक्के रोख, ३० टक्के टीडीआर आणि २० टक्के आरसीसी बॉण्ड
सिंहस्थ प्रोत्साहनपर टीडीआर- सध्या एक एकर जागा असेल तर दोन एकरचा भाव गृहीत धरून टीडीआर दिला जातो. तो या ठिकाणी ३ किंवा ४ पट याप्रमाणे दिला जाऊ शकतो.
नगरपरियोजना अर्थातच टीपी स्कीम, साधूग्रामसाठी आवश्यक जागा ताब्यात घेऊन ५० टक्के जागा स्वतःच्या ताब्यात घ्यायची व ५० टक्के जागा विकासकाला द्यायची.
पर्यायी नगरपरियोजना अर्थातच टीपी स्कीम- यामध्ये साधूग्रामसाठी जागा ताब्यात घेऊन मालकांना पर्यायी जागा द्यायची.