

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने शहराभोवती सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये खर्चून रिंगरोड तयार करण्यात येणार आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या रिंगरोडसाठी सुमारे १,५०० कोटींचे भूसंपादन, तर चार हजार कोटीतून रिंगरोडची बांधणी होईल, अशी माहिती जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात त्यांनी गुरुवारी (दि. १९) सिंहस्थ कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजेपासून बैठकांचे सत्र सुरू होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शहरातील वाहतूक समस्या आणि सिंहस्थ तयारीबाबत वेगाने निर्णय घेतले जात आहेत. रिंगरोडसाठी कोणते रस्ते जोडायचे आणि नॅशनल हायवेची मदत घ्यायची का, यावर मंथन सुरू आहे. द्वारका चौकातील वाहतूककोंडीची शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. सिंहस्थासाठी 2200 कोटींच्या कामांसाठी ‘पीडब्ल्युडी’कडून या आठवड्यात निविदा प्रसिद्ध होणार आहेत. गोदाघाट, ड्रेनेज आणि एसटीपीसह इतर कामेही हाती घेतली जाणार आहेत. याशिवाय, द्वारका चौकातील वाहतूककोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यासाठी २२ जून रोजी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नॅशनल हायवेचे अधिकारी उपस्थित राहतील. यावेळी उड्डाणपूल व मेट्रो प्रकल्पासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
साधुग्रामसाठी साडेतीनशे एकर भू-संपादनाचा निर्णय प्रक्रियेत असून यासंदर्भात मुख्यमंत्री सचिवांसोबत गुरुवारी (दि. १९) चर्चा झाली. आठवड्याभरात तोडगा निघणार असून 10 ते 15 शेतकऱ्यांना मुंबईत बोलावून मोबदला रोख रक्कम की टीडीआर यावर निर्णय होणार आहे. सुमारे 2400 कोटींच्या भूसंपादनाबाबत निर्णय अपेक्षित आहे.
कुशावर्तात स्नानासाठी जागेअभावी आखाडा परिषदेने सुचविल्याप्रमाणे त्र्यंबकबाहेर गोदाकाठी नवीन कुंड उभारण्यात येईल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली. पाच आखाडे कुशावर्तात स्नानावर आग्रही असले तरी, कोट्यवधी भाविकांच्या गर्दीमुळे नव्या कुंडाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी भूसंपादन करून योग्य व्यवस्था केली जाणार आहे.
जेव्हा पक्षात मोठे प्रवेश होतात, तेव्हा थोड्याफार कुरबुरी असतात. एक वर्ग नाराज होतो. मंत्रीमंडळात असे अनेक नेते आहे, ते जेव्हा आले तेव्हा ते आमच्यासाठी नवीन होते, मात्र नंतर आम्ही एकरुप झालो, प्रवेशाचे अजून दोन-तीन टप्पे बाकी आहेत. पुढील आठवड्यात चमत्कार बघा, विरोधी पक्ष नेत्यांचे प्रवेश होतील, असेदेखील महाजन यांनी यावेळी जाहीर केले.