

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारणीकरिता २८३ एकर जागेच्या कायमस्वरूपी भूसंपादनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर आता या भूसंपादनाकरिता 'फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला अर्थात ५० टक्के रोख रक्कम व ५० टक्के टीडीआर स्वरूपात मोबदला अदा करण्याच्या निर्णयावर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, सदर जागा ना विकास क्षेत्रात असल्याने रेडीरेकनर दरही कमी असल्याने जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता रेडीरेकनरच्या दरात काही सुधारणा करता येईल का, यावरही शासनस्तरावर विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. १) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थाचे ध्वजारोहण होणार असून, पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. गत कुंभमेळ्यात सुमारे एक कोटी भाविक आले होते. आगामी कुंभमेळ्यात दहा कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे. सिंहस्थात येणाऱ्या साधू-महंतांच्या निवासव्यवस्थेसाठी तपोवनात साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. यासाठी एक हजार एकर जागेची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी सातशे एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. ९३ एकर जागा महापालिकेने कायमस्वरूपी संपादित केली असून, २८३ एकर जागेचे संपादन शिल्लक आहे. यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यामध्ये प्रथम जागा संपादनासाठी ४५ टक्के रोख रक्कम, ४५ टक्के टीडीआर व १० टक्के आरसीसी बॉण्ड असा प्रस्ताव तयार करण्यात आला. अद्याप त्यास परवानगी मिळू शकली नाही. रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर साधुग्राम भूसंपादनासाठी ५० टक्के रोख व ५० टक्के टीडीआर स्वरूपात मोबदला अदा करण्याचा फॉम्र्युला अंतिम होण्याची शक्यता आहे.
सिंहस्थ साधुग्रामच्या भूसंपादनाकरिता सुमारे चार ते पाच हजार कोटींची आवश्यकता आहे. ५० टक्के रोखीने व ५० टक्के टीडीआर स्वरूपातही मोबदला दिल्यास महापालिकेला किमान दोन हजार कोटी रुपये जागामालक शेतकऱ्यांना अदा करावे लागतील. या निधीसाठीदेखील महापालिकेला शासनावर अवलंबून राहावे लागणार आहे.