

सोनगीर (प्रतिनिधी), पुढारी वृत्तसेवा :
शिरपूर गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी करत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध शस्त्रांसह दोन आरोपींना जेरबंद केले आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तत्परता दाखवत मोठी कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत कारतूसांसह दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही इसम गावठी पिस्टलची खरेदी-विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला असता दोन संशयित इसम एकमेकांमध्ये व्यवहार करताना दिसले.
त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे पवन दादा कोतवाल (वय १९, रा. हडपसर, पुणे) व अक्षय संदीप पाटील (वय २१, रा. भडाणे, ता. शिरपूर) अशी सांगितली. पोलिसांनी अंगझडती घेतली असता पवन कोतवाल याच्या कमरेवरून सुमारे २७ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत कारतूसे मिळून आली. पुढील चौकशीत पवन कोतवाल याने हे पिस्टल अक्षय पाटील याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यामुळे या प्रकरणात आणखी गांभीर्य प्राप्त झाले.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे उत्तम उदाहरण असून शहरातील कायदा-सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील संभाव्य गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.