

Sharad Pawar's NCP 'Black Diwali' for complete loan waiver for farmers
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.१७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत मौन धारण निषेधात्मक 'काळी दिवाळी' साजरी करण्यात आली. अतिवृष्टीने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. परंतु, दिवाळी एक दिवसावर आली असली तरी अद्याप कुठलीच मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या वतीने शुक्रवारी (दि. १७) राज्यभरात हे आंदोलन करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार भास्कर भगरे, शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, गोकुळ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी महायुती सरकारने जाहीर केलेले ३१,५०० कोटींचे पॅकेज हे पूर्णतः फसवे, दिशाभूल करणारे आणि शेतकऱ्यांच्या भावनांची थट्टा करणारे आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात फारच कमी रक्कम पडणार असून, या मदतीने शेतकऱ्यांचे काहीच होणार नाही. यासाठी ही दिवाळी 'काळी दिवाळी' असून, जिल्हा प्रशासनाच्या समोरच आम्ही साजरी करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मौन धारण करत सरकारचा निषेध नोंदविला.
आंदोलनात लक्ष्मण मंडाले, नितीन भोसले, मुन्नाभाई अन्सारी, दीपक वाघ, सुनील कोथमिरे, संजय गालफाडे, समाधान कोठुळे, विक्रांत डहाळे, डॉ. सयाजी गायकवाड, विजय मटाले, संतोष गायधनी, रामकृष्ण झाडे, अशोक पालदे, डॉ. युवराज मुठाळ, दीपक वाघ, सचिन आहेर, प्रवीण नागरे, सोनाली बोडके, सुषमा कावरे, प्रकाश धोंगडे, संजय कातकाडे, गणेश मोरे, बबलू ढकोलिया, रतन चावला, महेंद्र बोरसे, किरण पानकर आदी सहभागी झाले होते.
राज्यात तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. ओला दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५०,००० मदत द्यावी. विहिरी, जनावरे, घरे, दुकाने यासाठी वाढीव थेट आर्थिक मदत द्यावी. पीकविमा ट्रिगरमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी. शिक्षण फी माफ करून शेतकरी मुलांना दिलासा द्यावा.