

ठळक मुद्दे
नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा ; काळ्या आईशी इमान राखण्यासाठी आलो आहे
तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव घेता मात्र, बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाहीत
कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर नाशिकचा मोर्चा उग्र रूप घेईल : पवारांचा इशारा
Farmers are crying out. However, Pawar lashed out saying that the politicians are ignoring them.
नाशिक : शेतकऱ्यांचा संसार अडचणीत आला आहे. देवाभाऊ तुम्ही महाराष्ट्रभर पोस्टर लावून शिवरायांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले आहे. मात्र, शिवाजी महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी सोन्याची नाणी दिली. त्यामुळे सोन्याचा नांगर शेतकऱ्यांना घेता आला. तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव घेता मात्र, बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाहीत असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तसेच राज्यकर्त्यांना बघ्याची भूमिका घेता येणार नाही. कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर नाशिकचा मोर्चा उग्र रूप घेईल असा इशाराच पवार यांनी दिला. तसेच देवाभाऊ आजूबाजूला बघा, नेपाळमध्ये सरकार गेले अन् भगिनीच्या हातात राज्य आले. यावर मी आणखी काय बोलणार असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.15) नाशिक येथे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या समारोपास खा. पवार यांनी संबोधित केले. पवार म्हणाले की, काळ्या आईशी इमान राखण्यासाठी आपण आलो आहोत. शेतकरी अस्वस्थ आहे. बीडसारख्या जिल्ह्यात दुष्काळी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. राज्यभरात अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम शेतीवर झाला आहे. संकटातून मार्ग काढायचा असतो तो मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्राची असते. शेतकरी आक्रोश करत आहे. मात्र, राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा हल्लाबोल पवार यांनी केला. नाशिकचा कांदा घराघरात जातो. त्याचे दोन पैसे मिळावेत ही शेतकऱ्यांची इच्छा असते. ज्यामुळे मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण करता येईल. मात्र, केंद्र सरकारने निर्यात बंदी केली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे दुख समजत नाही असे सांगत, त्यांनी केंद्राच्या कृषी धोरणांवर टिका केली. चुकीच्या धोरणांनी आत्महत्या होत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते, निलेश लंके, भास्कर भगरे, बाळूमामा म्हात्रे, प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार, रोहिणी खडसे आदी उपस्थितीत होते.
पवार म्हणाले की, ग्रामीण भागत दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. मराठवाड्यातील संख्या जास्त आहे. शेतकरी जीव का देतो कारण त्याच्या संकट काळात त्याच्या पाठीशी सरकार राहत नाही. कृषीमंत्री असताना माझ्या वाचनात आले की, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे. तेव्हा दुसऱ्याच दिवशी मनमोहन सिंग याना विनंती केली की, आपल्याला दिल्लीत बसून विषय सुटणार नाहीत, त्यासाठी त्या ठिकाणी जायला हवे. तेव्हा लागलीच आम्ही यवतमाळला गेलो. तिथे जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. शेतकऱ्यांची बायको रडली. मी तिला विचारले मालकाने जीव का दिला तिने सांगितले कर्ज वाढले होते. सोसायटी देता आली नाही. त्यानंतर सावकाराच कर्ज काढले ते देखील थकले होते. त्यानंतर सावकार घरी आला आणि आमच्या अब्रूचा पंचनामा केला हे त्यांना सहन झाले नाही. त्यांनी जीवन संपविले. त्यानंतर दहा दिवसांत आम्ही 70 हजार कोटींचे कर्ज देशात माफ केल्याचे त्यांनी सांगितले.