

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण विभागातील बहुचर्चित शालार्थ बनावट आयडी घोटाळ्यात संशयित आरोपी असलेले शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या जामीन अर्जावर आता १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चव्हाण यांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.
त्यामुळे एक वर्षाहून अधिक काळ ते अटकेपासून दूर आहेत. आता त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे शिक्षण विभागासह तपास यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला सुरुवात झाली, त्यावेळी भाऊसाहेब चव्हाण हे या प्रकरणातील फिर्यादी होते.
मात्र, तपासाचा विस्तार होत असताना समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांचा कथित सहभाग तपास यंत्रणेच्या निदर्शनास आला. त्यानंतर चव्हाण यांनाच या प्रकरणात संशयित आरोपी करण्यात आले.
तपासादरम्यान ते काही काळ फरार असल्याचेही समोर आले होते. दरम्यान, या प्रकरणात बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, वेतन आणि शासकीय नोंदींशी संबंधित गैरप्रकार झाल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे. या घोटाळ्यात शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांचाही जामीन अर्ज अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या जामीन अर्जावरील १२ ऑक्टोबरची सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे.