

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाचे घटलेले प्रमाण, खरीप पिकांची खुंटलेली वाढ आणि रब्बी हंगामाच्या पेरणीवर निर्माण झालेले संकट यामुळे जिल्ह्यावर चाराटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. खरीपातील भात पिकापासून मिळणारा पेंढा त्याबरोबरच बाजरीचा कडबा यासह माळरानावरील गवताचे उत्पादनही घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात चाराटंचाईची चाहूल लागत असून, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न पुढील काळात अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील १० तालुक्यांचा समावेश दुष्काळी भागाच्या यादीत झाला असून, चांदवड व नाशिक या दोन तालुक्यांचाही समावेश ट्रिगर - १ मध्ये करण्याचा विचार सुरू आहे. तसेच निफाड, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर या तीन तालुक्यांचाही समावेश दुष्काळी यादीत करण्याबाबत फेरविचार होण्याची शक्यता आहे.
या सर्वच तालुक्यांमध्ये यंदा पावसाचे प्रमाण असमान आणि कमी असल्यामुळे या भागातील पिकांना फटका बसला असून, त्यातून मिळणारा चाराही कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः इगतपुरीसारख्या डोंगराळ तालुक्यात पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांहून कमी राहिल्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे.
डोंगराळ भागात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या गवताची वाढही अपेक्षित प्रमाणात झालेली नाही. खरीप हंगामात आवश्यक पाऊस झाला नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, त्यातून मिळणारा कडबा, पेंढा आणि अन्य अवशेष स्वरूपातील चारा यंदा मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.
खरीप पिकांपासून मिळणाऱ्या चाऱ्याची उपलब्धता कमी होणार असतानाच, पावसाअभावी रब्बी हंगामातील पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे रब्बीतील ज्वारी, मका, गहू, हरभरा आदी पिकांच्या अवशेषांतून मिळणारा चारा अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता आहे.
चारा देणारी पिके:
नाशिक जिल्ह्यात भात पिकासह ज्वारी, मका, बाजरी, वरई, नागली यांसारखी पिके पशुधनासाठी चारा म्हणून महत्त्वाची आहेत. मात्र पाण्याच्या उपलब्धतेत कमी असल्यामुळे या चारा पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्याबरोबरच पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे.
१७ लाखांहून अधिक पशुधनाचा प्रश्न:
१. नाशिक जिल्ह्यात सुमारे १७ लाख ४६ हजार पशुधन आहे. यामध्ये गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश आहे.
२. पावसाची स्थिती सुधारली नाही आणि रब्बी हंगामात अपेक्षित उत्पादन झाले नाही, तर एवढ्या पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
३. चारा छावण्या, चारा डेपो, वैरणीचे नियोजन तसेच शेतकऱ्यांना चारा पिकांसाठी आवश्यक मार्गदर्शन व उपलब्धता याबाबत आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे.