

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बनावट शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शेंदुर्णी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील संजय भास्करराव गरूड याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. स्वतःच्या संस्थेतील तब्बल १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व नियुक्तीचे बनावट प्रस्ताव तयार करून शालार्थ प्रणालीत नोंदी केल्या.
त्या आधारे शासनाकडून वेतन व थकबाकीची रक्कम उचलून, शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे एसआयटी तपासात निष्पन्न झाले आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान एसआयटीने केलेल्या चौकशीत बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सुमारे १,२०० आरोपी निष्पन्न झाले असून, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण विभागातील अधिकारी तसेच इतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे संजय गरूड हा सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील फार्म हाऊसमध्ये लपून बसल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा टाकून सोमवारी (दि.२७) सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधीन केले. गरूड यापूर्वी काँग्रेसमध्ये सक्रिय होता. नंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे या घोटाळ्याचा तपास आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील बड्या व्यक्तींवर कारवाईचा वेग वाढला आहे. या प्रकरणात यापूर्वी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष नितीन उपासनी, प्रशांत वाडिले आणि चंद्रशेखर हिंगणेकर यांना अटक झाली आहे. उपासनी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.