

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ हद्दीत पणदूर आणि वेताळबांबर्डेत पावसाने खड्डे पडण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. वेताळबांबर्डे पुलानजीक पणदूर येथे गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर खड्ड्यांची समस्या वारंवार निर्माण होत आहे. वेताळबांबर्डे ब्रीजनजीक कुडाळच्या दिशेने जाताना त्याच दिश्याच्या लेनवर मोठा खड्डा पडला आहे.
हा खड्डा खोलवर असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा खड्डा अपघातांना निमंत्रण देत असून यापूर्वीही याच ठिकाणाच्या खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र याबाबत महामार्ग प्रशासन मात्र सुशेगाद असल्याचे दिसून येत आहे.
चौपदरी महामार्गावर कुडाळ तालुक्याच्या हद्दीत गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर पणदूर आणि वेताळबांबर्डेत दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. वेताळबांबर्डे पुलानजीक पणदूर येथे यंदाही खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. चार दिवसांपूर्वी महामार्ग ठेकेदार प्रशासनाकडून डांबरी रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने बुजविण्यात आले.
ठेकेदार प्रशासनाने अनोखी शक्कल लढवून येथील खड्ड्यांची दरवर्षीप्रमाणे मलमपट्टी केली खरी, परंतु गेल्या दोन दिवसांतील पावसाने पुन्हा खड्डे डोके वर काढू लागले आहेत. वेताळबांबर्डे ओव्हरब्रिज सोडल्यावर कुडाळच्या दिशेने जाताना महामार्गावर मोठा खड्डा पडला असून, तो वाहतुकीला धोकादायक ठरत आहे.
खोल खड्डा असून त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना त्या खड्ड्याचा अंदाजच येत नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने खड्ड्यात आदळत आहेत. यामुळे वाहनधारकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तिथे खोलवर खड्डा पडला असून आतील खडी बाहेर येऊन महामार्गावर पसरली आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने अपघात घडला होता. यामध्ये दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली होती. गतवर्षीही येथील खड्ड्यात अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
मुख्य म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ठेकेदार प्रशासनाने महामार्गावरील खड्डे बुजविले होते. त्या खड्ड्यांची स्थिती पुन्हा 'जैसे थे' झाली आहे. महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असून ठेकेदार प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. अशा जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात वाढण्याची शक्यता असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. याकडे महामार्ग प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे.