

नाशिक : टोयोटा कार वापरणाऱ्या ग्राहकांना कंपनीची मेंबरशिप घेतल्यास जगभरातील कोणत्याही हॉटेलमध्ये दहा दिवस फ्री राहावयास मिळेल, असे आमिष दाखवून एका वृद्धाला दोन लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सुनील पाटील (रा. रिद्धी पार्क, टिळकवाडी, शरणपूर रोड) हे व्यावसायिक आहेत. पाटील यांच्याशी आरोपी नवी दिल्ली येथील क्लब रिसॉटो व्हेकॅशन प्रा. लि. च्या प्रा. लि. चे संचालक मंडळ, तसेच कपिल सिंग, अपर्णा चौहान, रविकुमार सिंग, अभिषेक गौतम व त्यांच्या इतर साथीदारांनी फोनद्वारे संपर्क साधला.
पाटील यांना दि. 28 मे 2025 रोजी द्वारका सर्कल येथे हॉटेल कोर्टयार्ड मॅरीएट येथे बोलावले. पाटील हे तेथे गेले असता आरोपींनी मिळून त्यांना आमचे टोयाटो कंपनीशी टायअप असल्याचे सांगितले व टोयाटो कार वापरणाऱ्या ग्राहकांना कंपनीतर्फे कंपनीची मेंबरशिप घेतल्यास 15 वर्षांकरिता दरवर्षी दहा दिवसांप्रमाणे जगभरातील कोणत्याही हॉटेलमध्ये फ्री राहण्यास मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपींनी पाटील यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.