

लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण दिसत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे 600 रुपयांची घट झाली असून, मागील 15 दिवसांमध्ये तब्बल 1000 रुपयांनी बाजारभाव खाली आले आहेत.
देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे दरांवर तीव्र दबाव निर्माण झाला आहे. यासह बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू आहे. अरब देशांच्या बाजारपेठेत चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध असल्यामुळे भारतीय कांदा निर्यातीवरही प्रतिकूल परिणाम होत आहेत.
या सर्व परिस्थितीचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांमध्ये विविध बाजार समित्यांमध्ये झालेल्या सुमारे 20 लाख क्विंटल कांद्याच्या आवकमुळे अंदाजे 175 ते 200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळच्या सत्रात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 1,505 वाहनांद्वारे सुमारे 23 हजार 420 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला जास्तीत जास्त 2,200 रुपये, किमान 700 रुपये, तर सरासरी 1,625 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
कांद्याच्या बाजारभावात सतत होत असलेली घसरण पाहता, भविष्यात उन्हाळी कांद्याप्रमाणेच लाल कांद्याचेही उत्पादन खर्च निघणे कठीण होईल, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याची निर्यात वाढविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
घसरलेले कांदा भाव (प्रतिक्विंटल रुपये)
16 डिसेंबर - 2,500
29 डिसेंबर - 2,200
31 डिसेंबर - 1,950
1 जानेवारी - 1,870
3 जानेवारी - 1,850
5 जानेवारी - 1,625
6 जानेवारी - 1,500
बांगलादेशातील परिस्थिती आणि अरब देशांतील स्पर्धात्मक बाजार यांमुळे भारतीय कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध असल्यामुळे निर्यातदारही खरेदी करताना सावध भूमिका घेत आहेत. परिणामी, लिलावात भाव टिकवणे कठीण झाले आहे.
प्रवीण कदम, कांदा निर्यातदार
कांदा दरात सतत होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्याच्या भावात कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. मेहनत, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढले असताना, बाजारात इतके कमी दर मिळणे परवडणारे नाहीत.
रामभाऊ भोसले, शेतकरी, गोंदेगाव